पाणी पुरवठा विस्कळीत : गर्मीमुळे नागरिकांचे हाल लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : अल्लीपूरसह परिसरातील १२ गावांतील विद्युत पुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे. परिणामी, पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना काळोखात खितपत राहावे लागत आहे. गर्मीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. येथील वीज कार्यलयात आठ कर्मचारी असून एक कनिष्ठ अभियंता आहे. असे असताना दोन दिवसांपासून दररोज रात्री ७ वाजतापासून वीज पुरवठा थोड्याही वादळामुळे खंडित होत आहे. यामुळे उकाड्याच्या दिवसांत व रात्रीही गर्मी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. १३ गावांतील जनतेला असह्य वेदना सोसून रात्र काढावी लागत असल्याने वीज वितरण कंपनीप्रती रोष व्यक्त होत आहे. कर्मचारी हजर राहत नसल्याने व कंत्राटी कामगार सुटीवर गेल्याने विद्युत दुरूस्तीची कामे ठप्प आहेत. तीन दिवसांपासून काळोख नारायणपूर - गणेशपूर, नारायणपूर, गोविंदपूर, डोंगरगाव, बल्लारपूर आदी गावांना नंदोरी येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो; पण ७ मे रोजी वादळी पावसाने नारायणपूर फिडरचे खांब व तारा तुटल्या. तेव्हापासून सावली फीडरवरून वीज पुरवठा केला जात आहे; पण बिघाड आल्याने तो अनियमित आहे. मागील तीन दिवसांपासून नारायणपूर परिसरातील वीज खंडित आहे. सुमारे २० दिवसांपासून तुटलेल्या खांबाची दुरूस्ती झाली नाही. तीन दिवसांपासून वीज नसल्याने पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंचन खोळंबले आहे. याबाबत नंदोरी येथील कनिष्ठ अभियंंता डोंगरे यांना विचारणा केली असता ७ मे रोजी वादळी पावसाने नारायणपूर फिडरचे खांब व तारा तुटल्या. सदर काम स्थानिक कंत्राटदाराकडून करून घेतले जात आहे. येत्या एक-दोन दिवसांत पुरवठा नियमित होईल, असे सांगण्यात आले.
दोन दिवसांपासून १३ गावांतील बत्ती गुल
By admin | Published: June 01, 2017 12:37 AM