पोहणा परिसरातील प्रकार : सणासुदीच्या दिवसात सर्वत्र काळोखवर्धा : पोहणा वीज वितरण कंपनी अंतर्गत येत असलेल्या २२ गावांवर दोन दिवसापासून अंधारात राहण्याची वेळ आली आहे. सिंगल फेजमुळे पाणी टंचाई, सोबतच रोगराई माठ्या प्रमाणात पसरली आहे. अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र काळोखाचे साम्राज्य आहे. पिपरी उपकेेंद्रांतर्गत ३१ गावे येतात. ८ हजार ५०० घरगुती ग्राहक तर ३ कंपन्यांना येथून वीज पुरविली जाते. पोहणा वीज केंद्रांतर्गत २२ गावे येत असून उपकेंद्र पिपरी अंतर्गत ३१ गावांचा समावेश आहे. या उपकेद्रातून ३० आॅगस्टपासून वीज पुरवठा खंडित झाला. तो अद्यापही पूर्वरत झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोहणा वीज केंद्रांतर्गत २२ गावात वीज पुरवठा खंडित असल्याने पोहणा बँकेचे व्यवहार ३० आॅगस्टपासून ठप्प झाले आहे. प्यायला पाणी मिळत नसल्याने विहीर व कालव्यातून पाणी आणावे लागत आहे. तसेच वीज नसल्याने शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प झाले आहे. बँक, दवाखाने, शाळा, कॉलेज, पीठ गिरणी यावरही मोठा परिणाम झाला आहे. या सर्व समस्या बुधवारी वीज कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांचा रोष पाहून काही वेळ वीज कार्यालय खोलून नंतर बंद करीत कर्मचाऱ्यांनी येथून पळ काढला. पोहणा डीसी अंतर्गत २२ गावे असून राठोड, धानोरकर, माहुरे, बेग, हे चार ४ लाईनमन आहेत. विशेष म्हणजे येथील अभियंता कावळे हे दोन दिवसापासून सुट्टीवर आहेत. सणासुदीच्या दिवसात ते नसल्यामुळे नागरिकांच्या समस्या निकाली कोण काढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातही ते मुख्यालयी राहत नसून नागपूर वरून ये-जा करीत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पोळ्याचा सण असल्याने गावात दिवसा उत्साहाचे वातावरण असते. पण रात्री ग्रामस्थांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उद्यापर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पोळा काळोखातच साजरा करावा लागणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.(शहर प्रतिनिधी)
दोन दिवसांपासून २२ गावे अंधारात
By admin | Published: September 01, 2016 2:16 AM