कामे रेंगाळली : वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क गिरड : स्थानिक वन विभागाचे कार्यालय मागील दोन दिवसांपासून कुलूपबंद आहे. विविध कामानिमित्त येणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. कार्यालय प्रमुखाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी, नागरिकांकडून करण्यात येत आहे. गिरड येथील सहायक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. तेव्हापासून या कार्यालयाचा कारभार रामभरोसेच सुरू आहे. कार्यालयीन वेळेत कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. या कार्यालयातील सहायक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली झाल्यापासून अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. नवीन अधिकारी रूज न झाल्याने मागील दोन दिवसांपासून कार्यालय कुलूपबंद ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांची अनेक कामे रेंगाळली आहेत. कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी नसल्याने वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते; पण ते कायमच बेपत्ता दिसतात. वन कार्यालयांतर्गत खुसार्पार, मोहगाव, शिवणफळ, जोगीनगुंफा, तावी येथील संरक्षित वनाचा कारभार सांभाळला जातो. यातील तावी बीट वगळता बऱ्याच जंगलातील कारभार रामभरोसे आहे. मोहगाव, जोगीणगुंफा, खुर्सापार जंगलात अवैध वृक्षतोड व शिकारीला उधान आले आहे; पण संबंधित कर्मचारी, वनरक्षक या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. येथील कार्यालयात अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांत समन्वय नाही. अधिकारी, कर्मचारी कधी येतात व कधी जातात, याकडे कुणाचेही लक्ष नाही. अनेकदा कार्यालय बंद असते. कामानिमित्त खर्च करून येणाऱ्या शेतकरी वा संबधित नागरिकांना परत जावे लागते. उपवन संरक्षकांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
दोन दिवसांपासून वन कार्यालय कुलूपबंद
By admin | Published: June 26, 2017 12:34 AM