लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. बऱ्याच दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना आता हा पाऊस नकोसा झाला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असल्याने घराच्या बाहेर पडणेही कठीण झाले आहे. बुधवारी काहीशी पावसाने उसंत घेतल्याने आता पावसापासून सुटका होईल, असे अपेक्षा होती. मात्र, पुन्हा ढगांची गर्दी व्हायला लागली असून भारतीय हवामान विभाग नागपूर यांनी जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारला गडगडाट आणि विजांसह अती पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून सतर्कतेचा इशारा दिला आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडात होत असताना कुणीही घराबाहेर पडू नये, तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये आणि पुराच्या पाण्यापासून लांब राहावे, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे मंगळवारी जिल्ह्यात चौथ्यांदा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. वर्धा, सेलू, देवळी, हिंणघाट, समुद्रपूर व आर्वी या सहा तालुक्यातील २३ मंडळामध्ये मंगळवारच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखीच भर घातली आहे. नदी-नाल्यांचे पूर घरात आणि शेतशिवारात शिरल्याने मोठा फटका बसला आहे. महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
ती केवळ अफवा, आधी मिळणार सूचना- सर्वत्र नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच काहींनी सोशल मीडियावर चुकीचे संदेश पाठवायला सुरुवात केली आहे. नुकताच एक चित्रफित व्हायरल होत असून त्यामध्ये निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले असून गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे सांगितले जात आहे. परंतु ती चुकीची माहिती असून या प्रकल्पाचे केवळ ३ गेट ५ सेमीने उघडण्यात आले आहे. यातून १२.७३ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्यापूर्वी पूर्व सूचना दिल्या जातात, असे निम्न वर्धा प्रकल्पाच्या उपविभागीय अभियंत्यांनी सांगितले आहे.
स्थानिक पूर परिस्थिती पाहून शाळांबाबत निर्णय घेण्याचे निर्देश...- जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार असल्याने हवामान खात्यानेही आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे काही शाळांनी सुट्या दिल्या असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही शिक्षकांना तशा सूचना केल्या आहे. पुरपरिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होऊ नयेत. किंवा कोणत्याही गावाला पुराचा धोका असल्यास स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने यासंदर्भात निर्णय घेण्याची मुभा शिक्षण विभागाने दिली आहे.