निवडणूक घमासान : बंडखोरांचाही राहणार बोलबाला प्रफूल्ल लुंगे सेलू वर्धा जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील, राजकारणात प्रचंड वादळी स्थिती असली तरी काँग्रेसच्या वितूष्ट असलेल्या जयस्वाल-शेंडे गटाने आपसात समझोता करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. उलट भाजपाच्या खेम्यात मात्र उमेदवारीवरून राजकीय खदखद वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या बारा जागांसाठी होणारी ही निवडणूक इच्छुकांच्या गर्दीमुळे काँग्रेस व भाजपाची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. काँग्रेसने आपसातील वैर दूर करून स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण तोडगा काढला आहे. हिंगणी, हमदापूर, केळझर, सुकळी (स्टेशन), झडशी, येळाकेळी या जि.प. गटात झडशी व येळाकेळी काँग्रेसच्या शेखर शेंडे गटाकडे तर उर्वरित जि.प.चे माजी अध्यक्ष विजय (पप्पू) जयस्वाल गटाकडे आपसात समझोता करून मार्ग काढण्यात आला. हिंगणी पं.स. गणाची उमेदवारीही दोन गटाच्या आपसी समझोत्यातून ठरणार आहे. यामुळे तालुक्यात काँग्रेसमधील बंडखोरीला पूर्णविराम मिळाला आहे. शेखर शेंडे विधानसभेसाठी उमेदवार असताना त्यांना जयस्वाल गटाने बिनशर्त पाठींबा दिला होता; पण सिंदी-सेलू बाजार समितीच्या निवडणुकीत शेंडे यांनी सहकार नेते सुरेश देशमुख यांच्याशी हातमिळवणी करीत जयस्वाल गटाला बाजूला सारले होते. तेव्हापासून शेंडे-जयस्वाल यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. जि.प. निवडणुकीत दोन्ही गटाने समजूतदारपणाची भूमिका घेत भाजपाला रोखण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपाची परिस्थिती मात्र मतदारांना व कार्यकर्त्यांना चक्रावून सोडत आहे. आ.डॉ. पंकज भोयर व जि.प. सदस्य राणा उर्फ रवींद्र रणनवरे यांच्यातील मतभेद वाढत असल्याचे दिसत आहे. हिंगणी जि.प. गटात राणा रणनवरे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजयु मोर्चाचे तालुकाध्यक्ष वरुण दप्तरी येथूनच इच्छुक आहे. उमेदवारी मिळाली नाही तर दप्तरी गट जि.प. व पं.स.च्या सर्व जागांवर उमेदवार उभे करतील, असा दम वरुण यांचे काका व सेलू नगरपंचायतीचे गटनेते शैलेंद्र दप्तरी यांनी दिला आहे. यामुळे आ.डॉ. भोयर यांचे दप्तरी गटाशी असलेले सौख्य मतभेदात परिवर्तीत झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात आ.डॉ. भोयर, राणा रणनवरे व दप्तरी, अशी भाजपाची तीन शकले होणार काय? याची भाजपाच्या गटात चिंता आहे. दप्तरी गट हिंगणी जि.प.च्या उमेदवारीसाठी दबाव निर्माण करीत असल्याची चर्चा आहे. भाजपा व काँग्रेस, अशी सरळ लढत सर्व मतदार संघात होणार असल्याने भाजपाची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी आ.डॉ. भोयर यांना सर्वांना सांभाळताना कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख माजी आमदार सुरेश देशमुख यांची भूमिका अद्यापतरी अस्पष्टच दिसत आहे. शिवसेना एक-दोन गणांत चांगलाच घाम फोडण्याची शक्यता आहे. सध्या सेलू तालुक्यात हिंगणी जि.प. मतदार संघाकडे प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणून पाहिले जात आहे. जि.प. चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल यांना राणा रणनवरे यांनी येळाकेळी गटातून गत निवडणुकीत पराभूत केले होते. तीच लढत हिंगणी गटात यंदा रंगणार आहे. यामुळे ही निवडणूक जयस्वाल यांच्यासाठी पुढील राजकीय भवितव्य ठरविणारी ठरणार आहे.
काँग्रेसच्या दोन गटांत हातमिळवणी तर भाजपाच्या गोटात अस्वस्थता
By admin | Published: January 25, 2017 12:49 AM