वर्धा : हिंगणघाट येथे मोहता मिल परिसरात अवैधपणे साठवलेल्या वाळू साठ्यावर धाड टाकून दोनशे ब्रास साठा जप्त केला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना साठ्याची माहिती प्राप्त झाल्यावर अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकाने ही कारवाई करून सर्व साठा हिंगणघाट तहसीलदारांच्या ताब्यात दिला. हा साठा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
या अवैध साठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह पथकातील नायब तहसीलदार अतुल रासपायले, अव्वल कारकुन अमोल उगेवार यांनी हिंगणघाट गाठून साठा जप्त केला. येथे हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसीलदार सतीश मसाळ यांचीही उपस्थिती होती. या पथकाला मिल परिसरात ठिकठिकाणी साठे दिसून दिसून आले.
आता हा जप्त केलेला वाळूसाठा नोंदणी केलेल्या व प्रतीक्षा यादीत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी सांगितले. या साठ्याची थेट जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर तत्काळ कारवाई झाली. हिच माहिती हिंगणघाटातील अधिकाऱ्यांना का मिळाली नाही? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.