१२ जुलैला निवडणूक : सहा महिने कालावधीपुलगाव : स्थानिक नगर परिषदेच्या अध्यक्षासह चार नगरसेवक अपात्र घोषित झाले. यानंतर नगराध्यक्षपद रिक्त होते. अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरत १२ जुलै रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येत आहे. मंगळवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्यास शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजपातर्फे प्रत्येकी एक नामांकन दाखल करण्यात आले आहे.नगर परिषदेत १० काँग्रेस, ३ अपक्ष व एक शिवसेना अशा १४ सदस्यांचा काँग्रेस व सहयोगी पक्ष, असा नोंदणीकृत गट होता. यापैकी माजी नगराध्यक्ष मनीष साहू, राजीव बतरा, सुनील ब्राह्मणकर, स्मीता चव्हाण हे चार काँग्रेसचे व जयश्री बरडे शिवसेना अशा ५ नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले. यामुळे काँग्रेसकडे ६ काँग्रेसचे व ३ अपक्ष असे ९ तर भाजपाकडे ५ नगरसेवक आहेत.मंगळवारी दाखल झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या नामांकन अर्जात काँग्रेसकडून गटनेता राजण चौधरी तर भाजपाकडून नगरसेविका सोनाली गाधने यांचा समावेश आहे. १२ जुलै रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रक्रिया पार पाडणार आहे. या निवडीकडे शहराचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्षपदासाठी दोन नामांकन अर्ज दाखल
By admin | Published: July 06, 2016 2:26 AM