वर्धा : शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी येथे १६ फेब्रुवारी रोजी घरफोडी झाली़ यात दोघांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने केली़ नितीन भालचंद्र टेकाडे (५२) रा. न्यू स्टेट बॅँक कॉलनी नालवाडी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़ १७ फेबु्रवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपासात माहितीवरून शास्त्री चौकातून अनिल काशिराम पाटील (१९) रा. श्रीराम कॉलनी, बोरगाव मेघे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले़ चौकशीत मोबाईल हॅन्डसेट तर घर झडतीत लॅपटॉप, टॅबलेट, दोन मोबाइल, कॅमेरा, तीन महागडे पेन, हार्डडिस्क, हातघड्याळ, विदेशी व देशी चलनाचे नाने असा ६३ हजार ९४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, पोलीस निरीक्षक एम. डी. चाटे यांच्या मार्गदर्शनात सफ़ौ़ उदयसिंग बारवाल, अशोक वाट, दीवाकर परीमल, आनंद भस्मे, अमर लाखे, कुलदीप टांकसाळे, दिनेश बोथकर, समीर कडवे, अनूप कावळे, अक्षय राऊत, अजय वानखेडे यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)
दोन घरफोड्यांना अटक; मुद्देमाल जप्त
By admin | Published: March 29, 2015 2:00 AM