नालवाडी चौकातील घटना : सायकलचा झाला चुराडा वर्धा : शहरातून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने सायकलला जबर धडक दिली. यात सायकलवरील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्धा ते नागपूर मार्गावरील नालवाडी चौकात घडला. चेतन दिवाकर धुर्वे (१८) रा. रिधोरा ता. सेलू आणि महेश शंकर सलामे (१७) रा. रोहणा ता. आर्वी, अशी जखमींची नावे आहेत पोलीस सुत्रानुसार, जखमी महेश सलामे हा स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीमध्ये तर चेतन धुर्वे हा न्यू आर्टस्, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी वर्धेत आलेले जखमी दोघेही नवीन नालवाडी भागातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहतात. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोघेही सायकलने कॉलेजमधून वसतगृहाकडे जात होते. दरम्यान, नालवाडी चौकात आले असता भरधाव असलेल्या एम.एच. ३२ क्यू. २८६१ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांना जबर धडक दिली. ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या ताब्यातील वाहन वाहनाखाली आलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा न दामटवित घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. ट्रॅव्हल्सचे चाक सायकलवरून गेल्याने सायकलचा चुराडा झाला. या अपघातात जखमी झालेल्या महेश व चेतन या दोन्ही विद्यार्थ्यांना परिसरातील नागरिकांच्या साह्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची शहर पोलिसांनी नोंद घेतली आहे.(शहर प्रतिनिधी) टिप्परची दुचाकीला धडक, दोन गंभीर पुलगाव : रेती घेऊन जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले. हा अपघात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडला. सौरभ आमटे रा. सिंदी (मेघे) व निलम प्रकाश धनवीज रा. धोत्रा (रेल्वे), अशी जखमींची नावे आहे. सौरभ व निलम हा एम.एच. ३२ व्ही. ०२०९ क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. दरम्यान, रेती घेऊन जाणाऱ्या एम.एच. २९ टी. १३६२ क्रमांकाच्या टिप्परने त्यांना जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी महेंद्र कांबळे, चंदू बन्सोड, उमेश उईके, सुधाकर बावणे, धीरज राजुरकर यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत पंचनामा केला. अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली. पूढील तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थी गंभीर
By admin | Published: February 09, 2017 12:37 AM