कापडाचा कोळसा : आठ लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज हिंगणघाट : येथील विठोबा चौकातील कपड्याची दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत आठ लाखाच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शनिवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास समाजसेवी पप्पू अवस्थी यांना विठोबा चौकातील श्रीचंदलाल उदासी यांच्या मालकीचे भोले वस्त्र भंडार व दिलीप उदासी यांच्या मालकीचे अमर वस्त्र भंडार या दोन्ही कापड दुकानातून धुर निघत असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी त्वरीत या प्रकाराची माहिती नगरपालिकेच्या अग्निशामन दलाला व पोलीस ठाण्याला दिली. अग्निशामन दलाने त्वरीत आगीवर नियंत्रण मिळविले; परंतु तत्पूर्वी संपूर्ण कापड साहित्य व फर्निचर जळून खाक झाले होते. बाजार ओळीतील ही दुकाने सलग असल्याने पुढचा अनर्थ टळला. अन्यथा बाजार ओळीतील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी आली असती. अमर वस्त्र भंडार मधील अंदाजे ५ लाखांचे साहित्य व भोले वस्त्र भंडार मधील अंदाजे ३ लाख रुपयांचे साहित्य असे एकून आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हिंगणघाट पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली आहे.(तालुका प्रतिनिधी)
दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
By admin | Published: February 13, 2017 12:39 AM