वर्धा : सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करंजी (भोगे) येथील रहिवासी अरुणकुमार थूल याला तिघांनी जीवे ठार मारले होते. ही घटना ६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. तेव्हापासून आरोपी फरार होते. मात्र, तब्बल २० दिवसांनी सेवाग्राम पोलिसांनी अरुणकुमारच्या मारेकऱ्यांना अटक केली असून दोन भावंडांसह एकास बेड्या ठोकल्या. आईचे अरुण सोबत अनैतिक संबंध असल्याने दोन्ही भावंडांनी एका मित्रासह अरुणकुमारला ठार मारल्याची कबुली आरोपींनी दिली.
पोलिसांनी अटक केलेल्यात अजय सुनील शेंडे (३०), रोशन सुनील शेंडे (२८) रा. भैसारे लेआऊट कामठवाडा सेवाग्राम आणि गौरव गोविंद कापटे (२५) रा. वरुड यांचा समावेश असून त्यांना सेवाग्राम येथून अटक करण्यात आली.
सिद्धार्थ दमडुनी थूल हा त्याच्या घरी असताना ६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास माजी पोलीस पाटील धनराज बलवर यांनी फोनद्वारे त्याचा भाऊ अरुणकुमार थूल याला अज्ञातांनी जबर मारहाण करुन ठार मारल्याची माहिती दिली. सिद्धार्थ याने घरी जाऊन पाहिले असता बेडरुमचा लाकडी दरवाजा तुटून खाली पडलेला दिसला. तसेच अरुणकुमार रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसून आला. अरुणकुमारच्या डोक्याला गंभीर जखमा होत्या. बाजूलाच दारुच्या शिशीचे तुकडे व एक लाकडी दांड्याचा तुटलेला तुकडा पडून दिसला. सिद्धार्थ याने याबाबतची तक्रार सेवाग्राम पोलिसात दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याची दखल घेत अरुणकुमारच्या तिन्ही आरोपींना शोधून अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल ईटेकार, हरिदास काकड, गजानन कठाणे, पवन झाडे, अभय इंगळे व सायबर सेलमधील कर्मचाऱ्यांनी केली.