मुद्देमाल हस्तगत : अन्य गुन्हे उघड होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार चाकी वाहनातील साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. ही घटना १० जून रोजी घडली. या प्रकरणातील दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गजानन उर्फ सोली उशागिरी भोसले व कन्हैया बिस्तरी पवार रा. चिकमोह पारधी बेडा येणोरा, ता हिंगणघाट अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. १० जून रोजी नंदलाल लुटावन यादव रा. ग्राम धवाय ता. भानुपूर (उत्तरप्रदेश) हे आपल्या परिवारासह भानपूर उत्तरप्रदेश येथून बिजापूर, कर्नाटक येथे कार क्र. केए ३४ एम ४६१४ जाण्यास निघाले होते. दरम्यान, दारोडा टोल नाक्याजवळ हॉटेलच्या बाजुला गाडी उभी केली. गाडी पूर्ण लॉक करून ते जमिनीवर विश्रांती करण्याकरिता लेळले. रात्री सुमारे २ ते ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात इसमाने गाडीच्या डाव्या बाजूचे गागील दाराच्या बाजूकडील खिडकीचा रबर कापून ग्लास काढला. यानंतर लॉक केलेले दार उघडून गाडीतील साहित्य लंपास केले. याबाबतच्या तक्रारीवरून वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न झाले. आरोपी अट्टल व चलाख असल्याने सतत ३ दिवस पाळत ठेवत शिताफीने त्यांना अटक करण्यात आली. यात गजानन उर्फ सोली उशागिरी भोसले व कन्हैया बिस्तरी पवार दोन्ही रा. चिकमोह पारधी बेडा येणोरा यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरट्यांकडून चोरीला गेलेल्या साहित्यापैकी २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील आरोपी सोली भोसले याच्यावर हिंगणघाट पोलीस ठाण्यात यापूर्वीही मालमत्तेविरूद्धचे अनेक गुन्हे दाखल आहे. आरोपींकडून परिसरात घडलेले इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस., अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या प्रत्यक्ष निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक अचलकुमार मलकापुरे, नामदेव किटे, पोलीस हवालदार हरीदास काकड, दीपक जाधव, वैभव कट्टोजवार, अक्षय राऊत, अनूप कावळे आदींनी केली.
वाहनातील साहित्य लंपास करणारे दोन चोरटे गजाआड
By admin | Published: July 02, 2017 1:03 AM