लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवजीवन एक्स्प्रेसने तिरुमला येथे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असलेल्या अकोला येथील दोन तरुणांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. वर्धा-हिंगणघाट रेल्वे रूळावर आष्टा शिवारात बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सागर सुभाष बागडे (२८) व सारंग विष्णू नाटेकर (२१) दोन्ही रा. अकोला, अशी मृत तरुणांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, सागर बागडे, सारंग नाटेकर, गणेश रामेश्वर कलप व त्यांचे दोन मित्र असे एकूण पाच तरुण तिरुमला येथे तिरुपती बालाजीचे दर्शनासाठी जात होते. ते नवजीवन एक्स्प्रेसने तिरुमलाच्या दिशेने प्रवास करीत असता सागर बागडे व सारंग नाटेकर हे दोघे रेल्वेगाडीच्या दरवाज्याजवळ उभे होते. धावती रेल्वे गाडी वर्धा जंक्शननंतरच्या भूगाव नजीकच्या आष्टा शिवारात आली असता सागर आणि सारंग या दोघांचा अचानक तोल गेला. दरम्यान, धावत्या रेल्वेगाडीतून हे दोघेही खाली पडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी गणेश कलप (२९) रा. अकोला याच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
देवदर्शनापूर्वीच घातला काळाने घालासागर, सारंग, गणेश व त्यांचे दोन मित्र असे एकूण पाच जण तिरुमला येथे तिरुपती बालाजीचे दर्शन करण्यासाठी जात होते. ते अकोला येथून नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चढले. सागर आणि सारंग रेल्वे गाडीच्या दरवाज्यात उभे असता त्यांचा तोल गेल्याने ते धावत्या रेल्वे गाडीतून पडले. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
हिंगणघाट येथे पाच मिनिटे थांबली नवजीवनघटना घडल्याचे लक्षात येताच ही माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसह सेवाग्राम पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनीही आपल्या हालचालींना वेग देत तातडीने घटनास्थळ गाठले. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास सेवाग्रामचे ठाणेदार संजय बोठे यांच्या मार्गदर्शनात सेवाग्राम पोलीस करीत आहेत.