आर्वी (वर्धा) : येथील आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून माझ्या परवानगीशिवाय दिलेला निधी परत घ्या, अन्यथा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. परंतु लगेच मुंबईत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आटोपून आर्वीत परतल्यावर आमदारांनी पत्रकार परिषद घेवून 'माझी कुठलीही नाराजी नाही, कोणताही निधी परत जाणार नाही. हा विरोधकांचा डाव असून या अफवांवर विश्वास ठेवू नका' असे आवाहन केले. त्यामुळे आमदारांचा हा यूटर्न आणि 'ना' राजीनाम्याची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.
आर्वीचे रहिवासी तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामाकरिता निधी मंजूर करण्याचा सपाटा लावला. हा सर्व प्रकार पाहून आमदार दादाराव केचे यांनी जाहीर सभेतून आगपाखड करीत उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. या सर्व घडामोडीनंतर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यावर आमदारांनी भूमिकाच बदलली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी माझे समाधान करून कारंजाकरिता मंजूर केलेला पाच कोटींचा निधी परत जाणार नाही. तसेच आष्टी व आर्वीकरिता जो निधी देणे बाकी होता, त्यावरही निर्णय झाला आहे. त्यामुळे आता राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आमदार केचे यांनी विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
नाल्या व पुलाच्या बांधकामासाठीच हा निधी नसून सर्वधर्म समभावाच्यादृष्टीने अनेक संतांच्या पावन कार्यासाठी, सर्व समाजबांधवांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही विकासकामे विरोधकांना सहन होत नसल्याने माझी बदनामी करण्याचा सर्व प्रयत्न सुरू आहे. संताजी महाराज सभागृह व इतरत्र जी कामे आहे, ती कोणतीही कामे रद्द होणार नाहीत. माझ्याबद्दल होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी तुमचाच आहे, तुम्ही माझे आहात हे लक्षात घ्या, असे भावनिक आवाहनही आमदार केचे यांनी केले. या पत्रकार परिषदेला अनिल जोशी, राजाभाऊ गिरधर, प्रशांत वानखडे, विनय डोळे, डॉ. श्यामसुंदर भुतडा, बाळा नादुरकर, नीलेश देशमुख, जगन गाठे, राजाभाऊ वानखेडे, मिलिंद हिवाळे, दिनेश भगत, रोशन पवार आदींची उपस्थिती होती.
विरोधाचा प्रश्नच नाही
उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे आणि माझ्यात कोणताही गैरसमज नाही. विकास कामांसंदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो, तेव्हा ते कोणताही कागद सुमित यांच्याकडे द्यायला लावतात. त्यामुळे विरोधाचा प्रश्न उद्भवत नाही. सुमित हे विकासकामाला हातभार लावतात, असे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.