लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव/नाचणगाव : शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर ४०१ लोकसंख्येचे गाव कविठगाव. आजपर्यंत तशी या गावची फारशी ओळख नव्हती; पण गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत उडी घेतली आणि जिल्ह्यात या गावाची ओळख पटली. सारे गावकरी एकत्र आले व पाणी फाऊंडेशनचे आव्हान स्वीकारून एकजुटीने कुदळ, फावडे, टोपले घेऊन कामाला लागले. सारे गाव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साथी हात बढाना म्हणत कामाला लागले. आपण केलेल्या या कामांतून नवीन जीव जन्माला येणार आहे. तो जीव म्हणजेच थोंब्या आणि आज मध्यरात्री या थेंब्याच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा होणार आहे.या वॉटरकप स्पर्धेत उंच भरारी मारण्याच्या जिद्दीने कविठगावचे ग्रामस्थ कामास लागले. आपले गाव पाणीदार व्हावे म्हणून ग्रामस्थांसोबत सरपंच नीला खेडकर यांच्या मित्र परिवारातील शहर महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना पवार, माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा घालणी, कलाविष्कार मंडळीही कविठगाव वॉटरकप स्पर्धेत सहभागी झाल्या. आज मध्यरात्री वॉटरकप स्पर्धा संपणार आहे. रात्री श्रमदानातून घेतलेल्या शेततळ्यांवर थेंब्याला सजवलेल्या पाळण्यात घालून एक वेगळाच उत्सव गावात साजरा करण्यात येणार आहे. थेंब्यासारखा दिसणारा कल्पनेतील एक बाळ तयार करून त्याला नवीन कपडे घालून पाच सुहासिनीच्या हातून पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात संपूर्ण गाव सजविले जाणार असून ते सहभागी होणार आहे. रात्री १२ च्या नंतर घरोघरी थेंब्याचे दर्शन व्हावे म्हणून रॅली काढण्यात येणार आहे.
वॉटर कप स्पर्धेमुळे अनोळखी कविठगाव प्रकाशझोतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:26 PM