लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आपल्या खांद्यावर देशहित, देशप्रेमाची धुरा सांभाळण्याची परंपरा पारतंत्र्याच्या काळात बघायला मिळत होती. सध्या हे देशप्रेम आपल्या भारतीयांच्या मनातून हद्दपार होत आहे. देशहितासाठी कोण लढतं अस म्हणण्याची वेळ आली आहे. देशहितापेक्षा स्व:हित श्रेष्ठ या मानसिकतेत समाज मन जगत आहे. सध्याचा भारत देश महात्मा गांधींना निश्चितच अभिप्रेत नव्हता. सध्या समाजाला अनुकरण कुणाचे करावे यात संभ्रम आहे. पारतंत्र्य काळात त्या पिढीने देशहिताचे कर्तव्य पार पाडले. देशासाठी बलिदान दिले, परंतु या देशात सध्या बलिदान देण्याचे भाग्य कुणाकडे आहे? ज्या स्वातंत्र्यानंतरच्या भारताचं स्वप्न महात्मा गांधींनी बघितलं होत या ७० वर्षात या स्वातंत्र्याची भेसुरताच अधिक प्रखरतेनं समाजात वर आली असल्याने हाच का महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत? असं म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधीचे पणतु तुषार गांधी यांनी व्यक्त केले.स्थानिक लोकमान्य वाचनालय आर्वी व स्व. आम. डॉ. शरदराव काळे स्मृती व्याख्यानमालेप्रसंगी ‘हा गांधीच्या स्वप्नातला भारत आहे का’? या विषयीच्या व्याख्यानप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष आमदार अमर काळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष जयंतराव देशमुख उपस्थितीत होते. यावेळी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार अमर काळे यांच्या हस्ते प्रमुख वक्ते तुषार गांधी यांचे स्वागत करण्यात आले तर व्याख्यान आयोजनामागची भूमिका अमर काळे यांनी मांडली. ते म्हणाले की, यापुढेही या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून आर्वीला आणणार आहे. एक वैचारिक समृध्दीची परंपरा आर्वीला लाभली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.व्याख्यानमालेप्रसंगी गांधी पुढे म्हणाले, पारतंत्र्यात राष्ट्र ही प्रमुख विचारधारा होती. या धारेला क्रांतीकारकांनी आपल्या जीवनाची आहूती देऊन प्राणापलिकडे जपले, सध्या कुणी देशासाठी लढत असल्याचे दिसून येत नाही. समाजात हीच वास्तविकता मोठ्या प्रमाणात वाढीस लागण्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्याचा भारत हा बांपूच्या स्वप्नातला भारत जबाबदारी हिन स्वहितापलिकडे देशहित आहे, हे आम्ही विसरत आहो. चेहऱ्यावर तिरंगा फासला म्हणजे देशभक्ती होते का? आम्ही भारताचे नागरीक जरूर आहो परंतु गोत्र, धर्म, समाज व शेवटी राष्ट्र या चौकटीत विखुरले आहो, हा राष्टÑनिर्मात्यांचा भारत निश्चितच होऊ शकत नाही. महात्मा गांधींना, भगतसिंगांना आताचा भारत कधीच अभिप्रेत नव्हता. या देशात राहून हा देश मजबूत करण्याची जबाबदारी आपली आहे. परंतु समाज मनात झपाट्याने विष कालविल्या जात आहे. आजही मंदिर मस्जिदचा वाद आम्ही समोर आणतो. स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षण प्रणालीत कारकून बनण्यापलिकडे आम्ही गेलो नाही, ७० वर्षात मात्र देशातली बेकारीच वाढली आहे. लोकशाहीचं खरा राष्ट्रवाद हेच प्रतिक आहे. राष्ट्रहित कायद्याचं राज्य, पिडीत लोकांना सुराज्य वाटेल असा भारत बापूंना अपेक्षित होता. महात्मा बनत नसतो तो जन्मावा लागतो आणि हा महात्मा कुण्या गांधी घराण्यातून येणार नाही तर तुम्हा-आम्हातूनच त्याचा जन्म होऊ द्या. या देशाच्या अद्योगतीला आम्हीच जबाबदार आहो. सत्य आम्हाला पचत नाही. आम्ही मेणबत्ती जाळणारा समाज तयार केला आहे. महात्मा गांधीच्या तीन बंदरांचे सर्वत्र समाजात विकृतीकरण होत असल्याची खंतही गांधी यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याची भेसूरताच समाजात वर आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:49 PM
आपल्या खांद्यावर देशहित, देशप्रेमाची धुरा सांभाळण्याची परंपरा पारतंत्र्याच्या काळात बघायला मिळत होती. सध्या हे देशप्रेम आपल्या भारतीयांच्या मनातून हद्दपार होत आहे. देशहितासाठी कोण लढतं अस म्हणण्याची वेळ आली आहे. देशहितापेक्षा स्व:हित श्रेष्ठ या मानसिकतेत समाज मन जगत आहे.
ठळक मुद्देतुषार गांधी : स्व. डॉ. शरद काळे स्मृती व्याख्यानमाला