वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मल्टी लेव्हल मार्केटिंगचा भूलभुलैया जोमाने फोफावत चालला आहे. उत्पादनाच्या विक्रीतून आलेल्या पैशाचा काही भाग विक्रेत्याला मिळतो; पण त्यातीलच एक मोठा अर्थभग हा पिरॅमिडच्या शीर्षस्थ घटकाला मिळतो. जो माणूस हे उत्पादन विकत घेतो, त्याच्या माध्यमातून आणखी नेटवर्क जोडण्यासाठी मग विक्रेता त्याला कमिशनच्या माध्यमातून श्रीमंत होण्याच्या शिडीचा मार्ग दाखवतो. मग ती व्यक्ती आणखी सात लोकांना ती उत्पादने विकत आपले मुद्दल काढण्याचा प्रयत्न करतो. या चक्राव्यूहात तुम्ही एकदा शिरत गेलात की मग अभिमन्यू व्हायला फारसा वेळ लागत नाही.
परतीचे दोर कापले गेले असतात. असाच काहीसा प्रकार वर्धा जिल्ह्यातही सुरू आहे. काही बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींना जाळ्यात ओढून ४६ हजार रुपयांची मेंबरशिप देऊन फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई येथील इंटरनेशिया प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून १८ ते २५ वयोगटातील बेरोजगार युवक-युवतींना आपल्या जाळ्यात ओढून दामदुपटीचे आमिष दाखविले जात आहे. यातून वर्धा तालुक्यासह देवळी आणि इतर तालुक्यातील युवक-युवतींची फसगत होत आहे. एका युवतीला ४६ हजार रुपयांनी गंडविल्याची बाब उजेडात आली असून, देवळी येथील एका युवकालाही गंडविल्याचे पुढे येत आहे. याबाबत सेवाग्राम पोलिसातही लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा कंपन्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर सेल तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.
पिरॅमीड फ्राॅड म्हणजे काय ?
अशा योजनेला किंवा फसवणुकीला पिरॅमिड असे नाव देण्यात आले आहे. कारण त्याची कार्यशैली पिरॅमिडल आहे. ज्यामध्ये शीर्षस्थानी असलेल्या एका बिंदूपासून सुरू होऊन ती तळापर्यंत पसरते. अशा योजनांतर्गत खालच्या स्तरातून पैसे गोळा केले जातात. आणि ते वरच्या स्तरावर जमा केले जातात. अशा कंपन्या मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणजेच एमएलएम नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फ्राॅड करीत आहे, हे विशेष.
‘एमएलएम’ म्हणजे काय ?
एखादा असा व्यवसाय ज्यामध्ये एखाद्याचे कुटुंब आणि मित्रांना उत्पादन विकून इतर लोकांना ते घेण्यास प्राेत्साहित केले जाते किंवा या कामात एकाकडून दुसऱ्या आणि दुसऱ्याकडून तिसऱ्या व्यक्तीला जोडण्याचा कामाला मल्टी लेव्हल मार्केटिंग किंवा डायरेक्ट मार्केटिंग म्हणतात. मात्र, अशी कामे खोडसाळपणे केली जात असल्याचा आरोपही होतो, हे तितकेच खरे.