लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वीच पावसाच्या दिरंगामुळे परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणी उशीराने केली. वेळोवेळी झालेल्या पावसामुळे पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, वर्धा जिल्ह्यात सध्या याच सोयाबीन पिकाची सहा इंच वाढ झालेली पाने काठाने पिवळी पडत आहेत. शिवाय त्याची पाने गुंडाळत असल्याने हा कुठला रोग आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.जून महिना कोरडा गेल्यानंतर झालेल्या पावसादरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे पिकांची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव सायाबीन पिकावर दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरातील सोयाबीन पिकावर उंटअळीचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येत होता. तर त्यानंतर झालेल्या संततधार पावसादरम्यान या अळीचा प्रादुर्भाव कमी झाला. परंतु, सध्या सोयाबीन पिकाची सहा इंच वाढ झालेली पान काठाने पिवळी पडत आहेत. शिवाय पानेही गुंडाळल्या जात असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. ही स्थिती तळेगाव (टा.), सोनेगाव, ऐकुर्ली शेत शिवारातील सोयाबीन पिकाची असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.
तळेगाव (टा.) शिवारात सर्वाधिक प्रादुर्भावतळेगाव (टा.) येथील प्रकाश देवढे यांच्या शेतातील सोयाबीनच्या पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे या परिसरातील तळेगाव (टा.) शिवारातील सोयाबीन पिकांवर सदर अज्ञात रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी देवढे यांनी यंदा तीन एकर कपाशी, एक एकरात भाजीपाला व एक एकरात सोयाबीनची लागवड केली. मात्र, अचानक आलेल्या या अज्ञात रोगामुळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.