वर्धा : अंगणवाडी कर्मचारी युनियन, आशा वर्कर युनियन, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, ग्रामरोजगार सेवक, डाटा एन्ट्री आॅपरेटर, तांत्रिक अधिकारी युनियन, वीज कंपनी कंत्राटी कामगार युनियनने विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात असंख्य असंघटित कामगार सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.या मोर्चात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संपकाळातील एक महिन्याचे वेतन देण्यात यावे. अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये, मदतनिसांना सात हजार पाचशे रुपये व मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकेचे वेतन देण्यात यावे, पेंशन योजनेचा लाभ मिळावा.आशा वर्करला केंद्र सरकारने १ जानेवारीपासूनचे मानधन व इतर वाढीव भत्ते द्यावे, राज्य सरकारने दरमहा तीन हजार रुपये मानधन द्यावे. शालेय पोषण आहार योजनेत कार्यरत सर्व महिलांना कायम करावे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन द्यावे, बचतगटांचा हस्तक्षेप बंद करावा. दरमहा वेतन द्यावे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अंगणवाडी कर्मचारी व शालेय पोषण आहार देणाऱ्या महिलांचे तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कष्टकरी महिलांची रक्कम बँकेने तातडीने द्यावी.ग्रामरोजगार सेवकांना दरमहा मानधन द्यावे, डाटा एन्ट्री आॅपरेटरचे तीन महिन्यापासून वेतन थकीत आहे. थकीत वेतन तातडीने द्यावे. संग्राम एजंसीचे काम ग्रामीण विकास मंत्रालयाने पंचायत विभागाकडे द्यावे, किमान वेतनाप्रमाणे दरमहा वेतन द्यावे, तांत्रिक अधिकाऱ्यांना पंचायत विभागाने सेवेत कायम करावे. कंत्राटीकरण बंद करावे. सामाजिक न्याय द्यावा, वीज कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे आदी मागण्या करण्यात आल्या. सोबतच महाराष्ट्र सरकारने असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना, महिलांना न्याय द्यावा. रेल्वेची तिकीट दरवाढ रद्द करावी. वाढलेली महागाई कमी करावी. राज्यकर्ते उद्योगपती व कंपन्यांना सवलती देतात. सर्वसामान्य जनतेला न्याय देत नाही, असा आरोप कामगार नेते राजू गोडे यांनी केला. इंदिरा मार्केट वर्धा येथून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व हसीना गोरडे यांनी केले. यावेळी किशोर चिमूरकर, आशा गळहाट, विजय पावडे, उईके, वंदना कोळणकर, माला भगत, मंजू खंडारे, शोभा तिवारी आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयावर असंघटित कामगारांचा मोर्चा
By admin | Published: June 25, 2014 12:35 AM