ग्रामस्थांचा आरोप : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह राज्यपालांकडे तक्रारवर्धा : आर्वी तालुक्यातील काचनूर येथील विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोप करीत चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन राज्यपालांकडे करण्यात आले आहे. सिमेट रस्त्याचे बांधकाम न करताच निधीची उचल करणे, बांधकाम न करता घरकुलाच्या रकमेची उचल करणे आदी प्रकार केलेत. याविरूद्ध ग्रामस्थांनी थेट महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तत्पूर्वी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, काचनूर ग्रा.पं. अनेक गैरप्रकार झाल्याच आरोप आहेत. सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचा निधी निधी हडप केल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. २००५-०६ पासून लक्ष्मण गेडाम ते कवडू कातलाम यांच्या घरासमोरील रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले नाही. असे असले तरी सदर रस्त्याचे ३० मिटर बांधकाम झाल्याचे दाखविण्यात आले आहे. वॉर्ड क्र. दोनमध्ये काशीराव वऱ्हाडे ते देविदास राऊत यांच्या घरासमोरील सिमेंट रस्ता झाला नसताना झाल्याचे दाखविण्यात आले. वॉर्ड क्रमांक एकमध्ये जहुनीच नाली होती. शंकर कातलाम ते मंदा नांदणे यांच्या घरापर्यंत ती दुरूस्त करण्यात आली; पण सचिवाने नालीच्या नवीन बांधकामावर एक लाख रुपये खर्च दाखविला. मृतक बाला महादेव गुडवार या कुली लेबरच्या नावाने ५२ हजार रुपये अॅडव्हान्स दिल्याचे आमसभेत सांगण्यात आले. ही रक्कम कोणत्या अधिकाराने दिली, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी नाली सफाईवरील खर्च २० हजार दाखविण्यात आला; पण नवनियुक्त समितीने हेच काम केवळ तीन हजार रुपयांत केले. यातही १७ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. प्रत्येक योजनेत अफरातफर झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थी यादीत असलेल्या आत्माराम दमडू मडावी (६३), पंजाब गुलाब श्रीराम (९०), राघु यशवंत आहाके (६९), जागो यशवंत आहाके (६८), रामराव केशव टेकाम (५६) व किसना कृष्णा रंगारी (२८) यातील काहींनी गाव सोडले तर काही मृत झाले. या लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकामच करण्यात आले नाही; पण घरकुलाचे काम झाल्याचे दाखवून रकमेचा अपहार झाला, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. काचनूर येथील या गैरप्रकाराची सर्वंकष चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी सह्यांसह दिलेल्या निवेदनातून केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांच्यासह महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदनाच्या प्रती सादर करण्यात आल्या आहेत. यातील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
घरकुलासह रस्ते व नालीच्या कामात गैरप्रकार
By admin | Published: December 04, 2015 2:22 AM