लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील अनेक परिसरात रस्त्यावरचे मार्केट तयार झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून पोलीस विभागासह नागरिकांची वाहतूक शिस्तीची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे. पोलिसांनीही बेशिस्त पर्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांतून करण्यात येत आहे. शहरातील विविध भागत बूट, चप्पल, कपडे, अन्नधान्यांसह फळविक्रेत्यांनी फुटपाथ मार्केटची सुरुवात केली आहे. शहरातील बजाज चौक, बॅचलर रोड, आर्वीनाका परिसर, वंजारी चौक आदी भागात मोठ्या प्रमाणात फुटपाथ मर्केट तयार झाले आहेत. तर शहरातील इतरही भागात असे फुटपाथ मार्केट तयार होत असताना याकडे मात्र, नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना ना जागेचे भान, ना डिपॉझिट त्यामुळे त्यांना दुकानाच्या तुलनेत कमी भावात वस्तू खरेदी करणे परवडते. मात्र, लाखो रुपये खर्च करुन दुकान थाटणाऱ्या व्यावसाियकांना याचा जबर फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. सोबतच शहरात जागोजागी अतिक्रमण केल्याने सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. इतकेच नव्हेतर शहरात बेशिस्त वाहतुकीलाही उधाण आले आहे. मिळेल त्या जागेवर वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघातही घडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच फुटपाथ मार्केट स्थायी होण्यापूर्वी यावर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे. नाही तर फुटपाथ मार्केट शहरातील पादचाऱ्यांसह दुचाकी, चारचाकी चालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वाहतूक कोंडी झाली नित्याचीचअपुऱ्या जागेमुळे अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने थाटली आहे. काहींकडून अर्ध्या रस्त्याचा बिनदिक्कत वापर केला जातो. बॅचलर रोड, मुख्य मार्ग, आर्वी नाक्याकडे जाणारा मार्ग, बॅचलर रस्त्यावरील बॅंकेसमोरील मार्ग, बजाज चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. इतकेच नव्हे तर निर्मल बेकरी समोरील रस्ता, महाराष्ट्र बॅंकेसमोरील रस्ता हा अरुंद असल्याने या मार्गाने ऐकरी वाहतूक करण्याचा आदेश होता. मात्र, आजघडीला या एकेरी मार्गावरुन सर्रास दोन्ही बाजूने वाहतुक होत असून वाहतुक कोंडी निर्माण होते. यामुळे सर्वसामान्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
फुटपाथ उरले नावालाच...शहरातील बहुतांश फुटपाथ हे विक्रेत्यांनी व्यापले आहेत. अनेक ठिकाणी फुटपाथवरच वाहने उभी केल्याचे दिसून येते. काही भागांत तर च्क्क रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्याचे दिसून येते.
बेवारस वाहनांमुळे कोंडी वंजारी चौक, बॅचलर रोड, आर्वीनाका परिसर आदी ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी जागेची व्यवस्था नाही. परिणामी, अनेक जण आपली वाहने रस्त्यावरच उभी करत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या एका बॅंकेपुढे पार्किंगची व्यवस्था नसल्याने बँकेत येणारे नागरक रस्त्याच्या मधात वाहने उभी करीत असल्याचे चित्र आहे.