लोकमत न्यूज नेटवर्क सिंदी (रेल्वे)/आर्वी/कारंजा (घा) : शुक्रवारी जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे), कारंजा (घा.) तसेच आर्वी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने वेळीच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारंजा भागात सकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील गहू, चणा तसेच संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषिउत्पन्न बाजार समितीत पावसाचे पाणी साचल्याने उघड्यावर पडून असलेले व्यापाऱ्यांचे धान्य भिजले. आर्वी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पपई, संत्रा, चणा, गहू उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही शेतांतील गोठ्यांवरील तसेच पाच घरांवरील टिनपत्रे उडाली. आर्वी शहरातील स्टेशन वॉर्ड येथील झाड तुटून पडल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली, तर आर्वी शहरातील वाल्मीक वॉर्ड येथील अली शाह अंबास शाह आणि शेख नईम शेख वजीर यांच्या घराचे नुकसान झाले. तालुक्यातील वाढोणा पुनर्वसन येथे देवानंद वसंत देऊळकर यांच्या घराचे नुकसान झाले आहे. बोरगाव येथे प्रभाकर निखाडे यांच्या घराचे नुकसान झाले. धनोडी येथे दत्ता कोल्हे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. आर्वी तालुक्यातील अहिरवाडा येथे वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडले. यात एका जनावराचा दबून मृत्यू झाल्याने वसंत सोनटक्के यांचे मोठे नुकसान झाले. कर्माबाद येथे वीज कोसळल्याने ज्ञानेश्वर मनोहर राऊत यांच्या मालकीच्या गोठ्याचे नुकसान झाले. धनोडी येथेही संजय रामकृष्ण देठे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. एकूणच उन्हाळी भुईमूग, रबी तसेच उन्हाळी विविध पीक घेणाऱ्या आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सिंदी (रेल्वे) परिसरात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे गहू, चणा तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला गहू व चणा भिजल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
सोसाट्याचा वाऱ्यामुळे अचानक झाला विद्युत पुरवठा खंडीतवातावरणात अचानक बदल होत, वादळी वारा सुटताच आर्वी शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
युद्धपातळीवर केले जातेय नुकसानाचे सर्वेक्षणवादळी वाऱ्यासह गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण कृषीसह महसूल विभागाकडून केले जात आहे. आर्वी तालुक्यातील अब्बास शेख नईम शेख, वसंत डेहनकर, प्रभाकर डेकाटे, वसंत सोनटक्के, मनोहर राऊत, संजय रामकृष्ण देठे, सुधीर केचे, प्रमोद नासरे यांना आर्थिक फटका बसल्याची नोंद आतापर्यंत घेण्यात आली आहे, तर उर्वरित सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. सर्वेक्षण तसेच पंचनाम्यांअंती नेमके किती नुकसान झाले याची इत्यंभूत माहिती जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे.