अपघाताची शक्यता : ड्रम काढल्याने वाहतूक विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या आर्वी नाका येथील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी येथे ड्रम लावले होते. पाच रस्ते एकवटत असल्याने या ड्रममुळे वाहनांना योग्य दिशा मिळून वाहतुकीला शिस्त लागली होती. मात्र काही दिवसांपूर्वी येथील ड्रम काढण्यात आले. त्यामुळे येथील वाहतूक पुन्हा बेशिस्त झाल्याचे चित्र आहे. आर्वी नाका येथून दिवसरात्र हजारो वाहने धावतात. चौक असल्याने येथे अनेकदा वाहन समोरासमोर येतात. वाहतुकीला योग्य वळण देण्याकरिता येथे चौकाची निर्मिती करण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्षच झाले. वाहतूक नियंत्रक पोलिसांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून येथे ड्रम ठेवले होते. वर्तुळाकार लावलेल्या ड्रममुळे वाहतूक बरीच शिस्तीत होती. वाहनधारक या ड्रमला वळसा घालुन वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करताना दिसत. येथे काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला. यातून वाहतुकीवर देखरेख ठेवण्यात येत असली तरी सध्या वाहतुकीची शिस्त मात्र बिघडली आहे. येथील वाहतूक नियंत्रक दिवे अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देत कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची मागणी जोर धरत आहे.
आर्वी नाक्यावरील वाहतूक झाली बेशिस्त
By admin | Published: June 10, 2017 1:23 AM