तळेगाव (श्या़पं़) : लोकसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांचा आकडा मोठा होता़ यामुळे राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १ जूनपासून मतदार याद्या ‘अपडेट’ करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेत़ यामुळे लोकसभेचे निकाल जाहीर होताच प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागणार आहे़ लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात अनेक मतदारासंघांत यादीतील नावे गहाळ झाल्याने तसेच काहींना नावेच नसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. विशेषत: काही पुरूष मतदारांच्या नावासमोर महिला तर महिला मतदारांच्या नावासमोर पुरूष लिहिलेल्या अनेक त्रुट्या या यादीत होत्या. अनेकांचे पूर्ण पत्तेही नसल्याने वंचित मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मतदार यादीतील नाव गहाळ झाल्याने काही गावांत उपोषण करण्याची वेळ मतदारांवर आली होती. या बाबीची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे़ विधानसभा निवडणुकीसाठी १ जून पासून मतदार याद्या अपडेट करण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे़ यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी गावपातळीवर बीएलओ, तलाठी यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे. मतदारांनी आपले नाव या यादीत समाविष्ट करण्याचे आवाहनही केले जात आहे़(वार्ताहर)
जून महिन्यात होणार मतदार याद्या ‘अपडेट’
By admin | Published: May 12, 2014 12:05 AM