भाजयुमोचे तहसीलदारांना निवेदन : मुख्यालयाला दांडी देणाऱ्यांवर कारवाईची मागणीआष्टी (शहीद) : शहिदांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्याच्या विकासाला शासकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसह मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे खीळ बसली आहे. या संदर्भात कारवाई करावी या मागणीचे निवदेन भारतीय युवा मोर्चाच्यावतीने तहसीलदार सीमा गजभिये यांना देण्यात आले आहे. आष्टीला तालुक्याचा दर्जा प्राप्त असून शासकीय कार्यालयामध्ये बऱ्याच जागा रिक्त आहेत. काही कार्यालयामध्ये मुख्य पदाची निर्मितीच केलेली नाही हे वास्तव्य आहे. येथे तालुका पशुवैद्यकीय दवाखाना असला तरी प्रारंभीपासूनच पशुधन विकास अधिकारी (वि.) पं.स. आष्टी पदाची निर्मितीच नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे तालुका कृषी कार्यालय असले तरी गत कित्येक दिवसांपासून तालुका कृषी अधिकारी पद हे प्रभारावरच काम करीत आहे. याशिवाय दोन कृषी पर्यवेक्षक, ५० टक्के कृषी सहायक तसेच आत्मा अंतर्गत दोन पदाची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय नसल्याने सन २००२ साली युवक वर्गाने ३४ दिवस आंदोलन केले होते. याची दखल घेवून शासनाने येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. याच्या बांधकामात विरोधकांनी अनेक प्रकारचे अडथळे निर्माण केले; परंतु माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नातून अखेर रुग्णालय बांधकाम एक वर्षापुर्वी पूर्ण झाले. बांधकाम पूर्ण होवून कर्मचारी अधिकारी नसल्याने सध्या या इमारतीतून प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ
By admin | Published: July 01, 2016 2:09 AM