लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरु केली आहे.राज्यात कोविड-१९ ची लस उपलब्ध होताच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १७ हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असून त्यांच्याकरिता १७ हजार ८१६ लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध आहे.
जिल्हा टास्कफोर्स समितीची सभाजिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय टास्कफोर्स समितीची बैठक पार पडली असून यामध्ये आरोग्य विभागाला लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. सचिन ओम्बोस, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, जिल्हा माता बालसंगोपण अधिकारी डॅा. प्रभाकर नाईक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॅा. नितीन निमोदिया, शिक्षणाधिकारी संजय मेहरे आदींची उपस्थिती होती.
कर्मचाऱ्यांना तालुका स्तरावरही मिळणार प्रशिक्षणपहिल्या टप्प्यात ग्रामीण भागासाठी ४ हजार ७९५, शहरी भागासाठी २ हजार ६८९ व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी १० हजार ३३२ अशा एकूण १७ हजार ८१६ लसीकरणाचे नियोजन करण्यात आल आहे. याकरिता नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षक यांचे एक प्रशिक्षण झाले असून १७ डिसेंबरला आणखी प्रशिक्षण होणार आहेत. तसेच तालुकास्तरावर एसडीओच्या अध्यक्षतेत टाक्सफोर्सची सभा होणार आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीय तसेच खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १७ हजार आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २०१ पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, परिचारिका आणि मदतनीस राहणार आहेत. त्यांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. नुकताच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आता वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षांसह पुन्हा प्रशिक्षण होईल.डॅा, अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी