लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : येथे कोट्यवधी रुपये खर्च करून नव्यानेच बांधलेल्या सुसज्ज बसस्थानकाची काही विघ्नसंतोषी टवाळखोरांनी वाट लावली आहे. तेथील विद्युत बल्ब, बोर्ड, पाण्याचे नळ आदींची तोडफोड केली आहे. या बाबी टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असे वृत्त 'लोकमत'ने १४ जून रोजी प्रकाशित केले होते. ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
बसस्थानक परिसराला टवाळखोरांनी आपला अड्डा बनविला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटनाही वाढत आहेत. शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह काही टवाळखोर बसस्थानकावर वावरतात. त्यांच्या उपद्रवात वाढ झाली आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी पुढे आली होती. 'लोकमत'ने तसे वृत्त प्रकाशित केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सीसीटीव्ही नसल्याने भामट्यांचे चांगलेच फावते आहे. त्यांच्या उपद्रवात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता बसस्थानकावरील लाईट, पाण्याचे नळ तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. तोडफोड केलेल्या इलेक्ट्रिक बोर्डला चुकून प्रवाशांचा हात लागला तर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
संपूर्ण बसस्थानक व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आणणे गरजेचे असताना एसटी महामंडळाला त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता वाटत आहे. कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बसस्थानकात संगणकीय युगात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, हे आता प्रवाशांचेच दुर्भाग्य आहे, असे बोलले जात आहे. या बसस्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांसह ग्रामीण भागात जाणाऱ्या अशा जवळपास २६२ बसफेऱ्यांचे आवागमन होते. यात १७० सुपर लांब पल्ल्याच्या, तर ९२ ग्रामीण फेऱ्या आहेत. विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या संधीचे सोने करीत उपद्रव करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
रिकामटेकड्या टवाळखोरांना पोलिसांच्या हवाली कराबसस्थानकाच्या छताखाली पीओपी व त्याला सुंदर साजेसे इलेक्ट्रिक लाईट व पंखे लावण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर प्रसाधनगृहातही लाईट व पाण्याचे नळ बसविण्यात आले आहे. सुसज्ज अशा बसस्थानकाचा सर्वांनी योग्य तन्हेने वापर करावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, टवाळखोरांनी तो आता आपला अड्डा बनविला आहे. अनेक जणांनी ठिकठिकाणी खर्राच्या पिचकाऱ्या सोडून प्रसाधनगृह व आजूबाजूचा परिसर घाणेरडा केला आहे. रिकामटेकड्या टवाळखोरांसोबतच काही विद्यार्थीही यात सहभागी असल्याचे बोलले जाते. परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देऊन तोडलेले साहित्य सुरळीत करून सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, ज्यामुळे उपद्रवी लोकांना पोलिसांच्या हवाली करणे सोपे जाईल, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.