वर्धा - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये बुलडाण्यातील दोन जवानांचा समावेश आहे. भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (16 फेब्रुवारी) बंदची हाक दिली. या बंदला वर्धेकरांनी स्वयंस्फूर्तपणे प्रतिसाद देत शांततेत बंद पाळला. स्थानिक व्यापा-यांनी शनिवारी सकाळी एकत्र येत वर्धा शहरातून शहिदांच्या स्मरणार्थ मोर्चा काढला. मोर्चा कच्छिलाईन येथे पोहोचल्यावर तेथे पुलवामा येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यापा-यांच्या मोर्चाने ‘अमर रहे शहीद, जवान अमर रहे’ अशा घोषणा देत वर्धा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले.
शनिवारी वर्धा शहरातील कपडा व्यावसायिक, सराफा व्यावसायिक, अनाज व्यावसायिक, कृषी व्यावसायिक, औषधी विक्रेता व्यावसायिक आणि आदींनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. पुलवामा येथील घटनेचा बदला घेत, दहशतवाद्यांना मदत करणा-या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचला, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.