- अभिनय खोपडे (वर्धा)
वर्धा येथील मगन संग्रहालय समितीच्या तेल स्वराज्य अभियानांतर्गत पारंपरिक तेल बियाणांचे संवर्धन करण्यासाठी विदर्भ जवस उत्पादक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळात १०५ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षी जवस बीज वितरण करण्यात येते. यावर्षी जवस उत्पादन क्षेत्र २०० एकरापर्यंत पोहोचले आहे.
सध्या या शेतकऱ्यांचे जवस खरेदी करून तेल प्रक्रिया केली जात आहे. यामुळे बंद पडलेला पारंपरिक तेलघाणी व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आला. सध्या या तेलाची विक्री महिला बचत समूहाच्या माध्यमातून वर्धा येथून केली जात आहे. या तेलाला बाजारात मोठी मागणी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जवसाची शेती करण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची मदत या प्रकल्पामुळे होत आहे.
या केंद्राशी सलग्न असलेल्या नैसर्गिक उत्पादन, विक्री आणि विपणनासाठी वर्धा शहरात मगन संग्रहालय समितीच्या परिसरात मगन मंडी उभारण्यात येत आहे. या माध्यमातून या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतमालाची स्थानिक आणि राज्य पातळीवर खरेदी-विक्री करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारापेक्षा अधिक भाव मिळणार आहे. येत्या काळात ग्राहकांनाही विषमुक्त माल उपलब्ध होणार आहे.
कापूस ते कपडा उत्पादन प्रक्रिया उद्योगपर्यंतची जोडणी या उपक्रमात करण्यात येत आहे. सध्या ५० हेक्टरमध्ये नैसर्गिक कपास उत्पादन करीत असून, शेकडो शेतकरी नैसर्गिक शेतीचे प्रयोग करीत आहेत. नैसर्गिक शेतीला लागणारे बीज, घनामृत, बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क आदी निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण संलग्न शेतकऱ्यांना दिले जात आहे.
विदेशातून येणारे तेल व तेलात होणारी भेसळ यामुळे नागरिकांच्या जीवनाशी छळ केल्या जात आहे. पारंपरिक घाणी बंद पाडणे, हे शासनाचे षड्यंत्रच आहे. शासनाकडून पारंपरिक घाणीला प्रोत्साहन देणाऱ्या कुठल्याच योजना नसल्या तरीही तेल स्वराज्य अभियान हा आमच्या चळवळीचा भाग आहे, असे मगन संग्रहालय समिती, वर्धाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, जवसाचे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याच्या पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी, खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.
बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते, असे औषधीही गुणधर्म आहेत.