जिल्ह्यासह विदर्भातील २७ गायक सहभागी : चरडे गुरूजी विदर्भस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा वर्धा : सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय व स्व. नीळकंठ अंबादास चरडे (गुरुजी) संगीत प्रशिक्षण संस्थेच्यावतीने विदर्भस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी झाले. उद्घाटक म्हणून अशोक कठाणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मंगल देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धकांनी उत्कृष्ट सुरांचा नजराना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या विदर्भस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे यंदाचे हे ३० वे वर्ष असून स्पर्धेत वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील एकूण २७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी अशोक कठाणे यांनी स्व. चरडे गुरूजी यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर प्रमुख अतिथी मंगल देशमुख यांनी शास्त्रीय गायनाकरिता साधना महत्त्वाची आहे. नवीन गायकांनी आपल्या गायनाचे परिक्षण स्वत: करून त्यात वेळोवेळी सुधारणा केली पाहिजे. शास्त्रीय गायकांनी केवळ सुगम संगीताकडे न वळता स्वतंत्र गायकी सादर करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून प्रा. विकास काळे यांनी स्व. चरडे गुरूजी व स्व. प्रभाकर खर्डेनविस यांच्या कार्याची माहिती दिली. स्पर्धेचे परिक्षण प्रा. सुरेश चौधरी, वसंत जळीत, श्रृती पांडवकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. चक्रधर सरोदे, गौरीशंकर टिबडीवाल यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरिक व शास्त्रीय गायनात रुची असलेले रसिक उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
भारदार शास्त्रीय गायनाने वर्धेकर रसिक मंत्रमुग्ध!
By admin | Published: December 26, 2016 1:38 AM