सत्यमेव जयते वॉटर कप : बनणार पाणीदार गाव लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळखुटा : आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथे सत्यमेव जयते वॉटर कप अंतर्गत विकास कामाकरिता महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यातील विविध समाजसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदवुन श्रमदानाच्या कार्याला हातभार लावला. एकेकाळी दूध व तुपाच्या बाबतीत नावलौकिक असलेला पिंपळखुटा परिसर सध्या सिंचनाच्या अभावी आर्थिकबाबतीत मागे आहे. तेव्हा गावकऱ्यांनी वॉटर कपच्या माध्यमातून व श्रमदानातून गावाच्या विकास करण्याचा निश्चय केला. गावाबरोबरच ईतरही सामाजिक संघटनेचे शेकडो हात कामाला लागले आहे. महिला व लहान मुलांचाही यात सहभाग आहे. स्पर्धेत उतरलेल्या गावातील विकास कामांनी वेग घेतला आहे. नवीन पिढीला हिरवेगार व वैभवशाली गाव देण्याचा मानस गावकऱ्यांनी व्यक्त केला. नियोजित काळातील झालेली कामे स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहे. उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. श्रमदानाच्या उपक्रमात गावातील तरूणांसह महिला व लहान मुल-मुली सहभागी झाल्या होत्या. तसेच विविध संघटनेचे कार्यकर्त्यांनीही श्रमदान केले. यात डॉ. अरुण पावडे, डॉ. भुतडा, अरुण ढोक, डॉ. धांदे आदींचा सहभाग होता.
महाश्रमदानात विविध संघटना व महिलांचा सहभाग
By admin | Published: May 14, 2017 12:50 AM