सबका साथ सबका विकास संमेलन : सिलिंडर जोडणीचे वाटप लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर सबका साथ सबका विकास संमेलन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार रामदास तडस होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे तर प्रमुख पाहुणे आमदार डॉ .पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकुर, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत बुर्ले, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वीरमाता व वीरपत्नीचा सत्कार करण्यात आला. यावेळी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे केंद्र शासनाने राबविलेल्या विकास योजनांची माहिती देण्यात आली. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना नगरपालिकेच्या तीन टक्के निधीतून निधी वाटप करण्यात आले. याशिवाय वन रँक वन पेन्शन योजनेतील सैनिक लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने बियाण्यांचे किट, कापडी कागदी पिशव्यांचे वाटप, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांचा सत्कार, पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील गॅस जोडणीचे वाटप, वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. मागील पंधरा वर्षात जनसामान्यांकरिता ज्या योजना राबविणे गरजेचे होते, त्या राबविल्या नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने या योजना तीन वर्षात राबवून जनसामान्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. जनहिताच्या योजना राबविण्याची मोहीम अशीच सुरू राहील, अशी ग्वाही खा. तडस यांनी यावेळी दिली. यानंतर आ. पंकज भोयर, अतुल तराळे, राजेश बकाणे आदींनी समायोचित मार्गदर्शन केले. वेस्टर्न कोल्डफिल्डस लिमिटेड उमरेड क्षेत्र यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वीरमाता व पत्नींचा गौरव
By admin | Published: June 24, 2017 1:00 AM