पुलगाव येथील घटना : युवक सावंगी रुग्णालयातवर्धा : रेतीचा एसएमएस तपासणीकरिता केलेल्या कारवाईच्या विरोधात पुलगाव येथील एका रेती व्यवसायिकाने पोलीस ठाण्यात येत ठाणेदाराच्या कक्षात विष प्राशन केले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सतीश पेठे असे या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने प्राशन केलेले द्रव्य विषारी नसल्याची माहिती बाहेर येताच हे विष नाट्यच ठरल्याची चर्चा झाली.युवकाने त्याच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रव्य प्राशन करताच पोलिसांनी त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्याने प्राशन केलेले द्रव्य विष नसल्याची माहिती पोलिसांना मिळाला. या माहितीला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नारळवार यांनी दुजोरा दिला. दरम्यान पोलिसांनी सदर युवकावर भादंविच्या कलम ३्र०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. सदर युवकावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस सुत्रानुसार, १० सप्टेंबरला सतीश पेठे नामक रेती व्यवयसायिकाचा रेती भरला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला होता. यातील चालकाच्या मोबाईलवरील रॉयल्टीचा संदेश खरा की खोटा याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून देवळी आणि धामणगाव येथील तहसीलदारांना पत्र देण्यात आले. याच काळात १८ सप्टेंबर रोजी नाचणगाव ग्रा.पं. चे उपसरपंच सुरेश देवतळे यांनी पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांची भेट घेतली. यावेळी तहसीलदारांचे पत्र आल्याशिवाय ट्रॅक्टर सोडू शकत नसल्याचे ठाणेदारांनी त्यांना सांगितले. दरम्यान गुरुवारी धामणगावच्या तहसीलदारांनी संदेश बरोबर असल्याचे पत्र दिले. यावरून ठाणेदार बुराडे यांनी उपसरपंच देवतळे यांना ट्रॅक्टर घेऊन जाण्यास सांगितले. ट्रक्टर घेण्याकरिता शुक्रवारी येण्याचे त्यांनी कळविले. शुक्रवारी सकाळी काही शिवसैनिक पोलीस ठाण्यात आले. ठाण्यात चर्चा सुरू होत नाही तोच सतीश पेठे धावत ठाणेदारांच्या कक्षात शिरला. त्याने जवळ असलेली बाटली काढून त्यातील द्रव्य प्राशन केले. आपण विष घेतल्याचे तो बोलताच ठाणेदारांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. गोपाळ नाराळवार यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला सावंगी रुग्णालयात पाठविले. सद्या तो सावंगी येथे उपचार घेत असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.त्याने प्राशन केलेले द्रव्य विषारी नव्हते तर ते काळ्या रंगाचे कुठले तरी आॅइल सदृश्य लिक्वीड असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. नारळवार यांनी याला दुजोरा दिला. शिवाय त्याच्या पोटात ते द्रव्य गेलेच नसल्याचे सांगितले. देखावा करण्यासाठी अंगावरच त्याने आॅइल सांडविल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी सतीश पेठे विरुद्ध भदंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार बुराडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
रेती वाहतूकदाराचे पोलीस ठाण्यात विषप्राशन नाट्य
By admin | Published: September 24, 2016 2:08 AM