वर्धा : चार मुख्यमंत्री महाराष्ट्राला देणाऱ्या विदर्भाला राज्याच्या मंत्रिमंडळात दोनदा उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर १९ नोव्हेंबर १९६२ला यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे मारोतराव सांबशिव कन्नमवार हे २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ या कालावधीत राज्याचे ३७० दिवस मुख्यमंत्री होते. कन्नमवार यांच्यानंतर विदर्भाचे सुपुत्र वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला. ते ५ नोव्हेंबर १९६३ ते १ मार्च १९६७ व त्यानंतर १३ मार्च १९७२ ते २० फेब्रुवारी १९७५ या कालावधीत मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर विदर्भातून सुधाकरराव नाईक यांनाही मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालावधीत ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. ते ३१ ऑक्टोबर २०१४ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री राहिले.
या चार मुख्यमंत्र्यांशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान दोन वैदर्भियांना मिळाला. विदर्भाचे सुपुत्र नाशिकराव तिरपुडे ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ या कालावधीत वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री होण्याचा मान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मिळाला आहे. आतापर्यंत राज्याच्या इतिहासात विदर्भाला चार वेळा मुख्यमंत्रीपद व दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळाले.
विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खाणार
भारतीय जनता पक्ष कायम लहान राज्यांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सातत्याने करत आलेले आहेत. गेल्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याने विदर्भ राज्याचा प्रश्न मागे पडला होता. अडीच वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने किमान समान कार्यक्रमातून विदर्भ राज्याच्या मुद्द्याला वगळले होते. आता राज्यात शिवसेनेचा फुटीर गट व भाजपची सत्ता आली असल्याने येत्या दोन वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी भाजपने रेटावी, अशी विदर्भवादी नेत्यांची मागणी आहे. याला शिवसेनेचा विरोध असला तरी फुटीर गटाचा विरोध राहणार नाही, असा विदर्भवाद्यांचा सूर आहे.