लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगामी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा, खुर्च्या खाली करा यासाठी जनजागरण करण्यासाठी २ ते १२ जानेवारीपर्यंत संपूर्ण विदर्भभर विदर्भ राज्य निर्माण यात्रा विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी बुधवारी २६ डिसेंबरला विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.यात्रा २ जानेवारीला नागपूर येथील गांधी पुतळा, सीताबर्डी येथून गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून दुपारी ११ वाजता छोटेखानी सभा होऊन एक विदर्भ निर्माण यात्रा पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांत फिरून १२ जानेवारीला नागपूरला परत येईल. तर दुसरी विदर्भ निर्माण यात्रासुद्धा २ जानेवारीला नागपूरवरून निघून पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यांतून फिरून १२ जानेवारीला नागपूरला परत येईल व दोन्ही यात्रा १२ जानेवारीला नागपूरला परत येऊन दुपारी १ वाजता नागपूरला समारोपीय सभा होईल.या दोन्ही यात्रेदरम्यान १०० लहान मोठ्या सभा करून विदर्भासाठी जनजागरण करण्यात येईल व भाजपचे वैदर्भीय जनतेला कसे फसविले, हा संदेश जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी अॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशिकर, मधुसूदन हरणे, गजानन निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अॅड. चटप म्हणाले, खोटे आश्वासन दिले त्याबद्दल येत्या निवडणुकीत भाजपला वैदर्भीय जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येत्या २०१९ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्वच विदर्भवादी पक्ष, संघटना यांनी एकत्र येऊन विदर्भ राज्य निर्माण करणे हा संकल्प करून निवडणूका एकत्र लढण्याचे ठरविले आहे. यापूर्वी काँग्रेस व आता सत्तेत असलेला भाजपा हे दोन्ही पक्ष विदर्भ देण्यास असमर्थ ठरले आहत्ो. त्यांच्या या नाकर्तेपणाविरूद्ध सर्व विदर्भवाद्यांनी एकजूट होऊन विदर्भ निर्माण महामंच तयार केला आहे. आगामी निवडणुकीत या दोन्ही पक्षांना त्यांच्या नाकर्तेपणाचा धडा शिकविण्यात येणार आहे.विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, आम आदमी पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, शेतकरी संघटना बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, रिपलब्लिकन पार्टी, जांबुवंतराव धोटे विचारमंच, राष्ट्रीय जन सुराज्य पार्टी, नाग विदर्भ आंदोलन समिती आदी विदर्भातील सर्व विदर्भवादी पक्ष विदर्भवादी संघटना यांचे नेते व प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक २७-२८ नोव्हेंबर २०१८ ला नागपूरला रवीभवन येथे पार पडली. या विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन येत्या निवडणुका विदर्भ निर्माण महामंचचे गठन करून या बॅनरखाली लढविण्याचे ठरविण्यात आले असल्याचे सांगतानाच संकल्प विदर्भ निर्मितीचा हे घोषवाक्य ठरविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.सर्वच पक्ष व संघटना यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून विदर्भ राज्य निर्माण हे एकमेव लक्ष ठरविण्यात आले आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच या नावाखाली येत्या लोकसभा व विधानसभा लढविण्यात येणार आहेत, असे सरतेशेवटी बोलताना त्यांनी सांगितले.
२ जानेवारीपासून विदर्भ राज्य निर्माण यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 8:15 PM
आगामी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ द्या, अन्यथा विदर्भातून चालते व्हा, खुर्च्या खाली करा यासाठी जनजागरण करण्यासाठी २ ते १२ जानेवारीपर्यंत संपूर्ण विदर्भभर विदर्भ राज्य निर्माण यात्रा विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी बुधवारी २६ डिसेंबरला विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देराम नेवले : विश्रामगृहातील पत्रपरिषदेत दिली माहिती