ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने आज वर्ध्यात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. या मोर्चात नोटबंदी व त्यामुळे झालेल्या दुष्परिणामाचा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला.
या मोर्चात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात आ. रणजित कांबळे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, शहराध्यक्ष राजेश शर्मा, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रवीण हिवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी प्रदीप मंगल कार्यालयात एक सभा पार पडली. या सभेला प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह चारूलता टोकस यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मोर्चा नियोजित मार्गे रवाना झाला. हा मोर्चा इतवारा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पाहोचला. मोर्चात सहभागी नागरिकांच्या हाती असलेले फलक व त्यावरील घोषवाक्य आकर्षक ठरले. येथे चारूलता टोकस व आ. कांबळे यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. मोर्चा पंचायत समिती कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांच्यावतीने मोर्चा येथे रोखण्यात आला. यानंतर मोर्चेकरांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता रवाना झाले.
जिल्हाधिकारी शैलश नवाल यांना निवेदन देताना त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाच्यावतीने नोटबंदीमुळे निर्माण झालेली स्थिती व सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतमालाला मिळत असलेले दर, शेतकऱ्यांकडून कर्जाची अव्वाच्या सव्वा दराने होत होत असलेली वसुली, यामुळे होत असलेल्या आत्महत्यांवरही चर्चा करण्यात आली. भाजीपाला वर्गीय शेतमालाचे दर पडल्याने शेतकरी ते फुकटात वाटत आहेत. काही ठिकाणी ते रस्त्यावर टाकत असून याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे, ही बाब खा. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या निदर्शनात आणून दिली. या सर्व प्रकाराची माहिती वरिष्ठांकडे पोहोचविण्याकरिता हे निवेदन देण्यात येत आहे. ते वरिष्ठांना पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
नरेंद्र अन् देवेंद्रच्या राज्यात जनता दारिद्री - अशोक चव्हाण
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आहे. या दोन्ही नेत्यांच्या सत्तेत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाती मात्र दारिद्र्य आले आहे. वर्धा ही महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुणीत झालेली भूमी आहे. यामुळे या आंदोलनाचा येथून प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोंदीबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या स्थितीवर पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची ताकद पंतप्रधानांत नाही. त्यामुळे ते चुप्पी साधून आहेत. नोंटबंदीच्या निर्णयानंतर केवळ गरिबांनाच रांगेत उभे रहावे लागले, कोणाताही श्रीमंत रांगेत दिसला नाही. एटीएमसमोर रांगेत काहींचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाच्यावतीने मदत देण्याची मागणीही खा. चव्हाण यांनी यावेळी केली.
नोटबंदीमुळे ७० टक्के छोटे उद्योग बंद - विजय वडेट्टीवार
नोंटबंदीचा निर्णय जाहीर झाला त्या काळापासून देशात सुमारे ७० टक्के छोटे उद्योग बंद झाले आहेत. शासन कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र अद्याप ४१ हजार गावात बँकांच्या शाखा नाहीत, मग हे कॅशलेस व्यवहार कसे होतील याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत नसल्याचे प्रतिपादन आ. वडेट्टीवार यांनी केले.
https://www.dailymotion.com/video/x844nhf