ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 5 - एकच पर्व बहुजन पर्व म्हणत वर्धेत अॅट्रॉसिटी कायदा आणखी कठोर करा यासह तब्बल ४३ मागण्यांकरिता गुरुवारी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बहुजनांची मोठी गर्दी होती. शहरातून विविध घोषणा देत निघालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात विसर्जित झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मोर्चात सहभागी होण्याकरिता बहुजन समाजाला आवाहन करण्यात आले होते. यानुसार मोर्चाकरिता दुपारी नागरिक एकत्र झाले. मोर्चासाठी दाखल बहुजनांना सत्यशोधक समाज तथा आयटक संघटनेचे अध्यक्ष गुणवंत डकरे, शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावंडे, महाराष्टÑ नाभिक महामंडळाचे पुंडलिक केळझरकर, अखिल भारतीय भिखु संघाचे सदस्य भदन्त संघवर्धन ब्योरो, सय्यद नियाज अली, आसिफ खान, हाफिज इमरान, हाफिज वसीम, स्मिता प्रफुल नगराळे, ज्योती मुंगले, चंद्रशेखर मडावी, अतुल आर. दिवे, आसिफ कुरेशी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यानंतर सभेचे रूपांतर मोर्चात झाले. येथून निघालेला मोर्चा पोस्ट आॅफीस मार्गे जिल्हा कारागृह, शिवाजी चौक मार्गे बजाज चौकात पोहोचला. येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात या मोर्चाचे विसर्जन झाले. तत्पूर्वी, एका शिष्टमंडळाने अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, मुस्लिम समाजाला सच्चर कमिशन लागू करा आदी प्रमुख मागण्यांसह तब्बल ४३ मागण्यांचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
या मोर्चामध्ये सुमारे ५० हजार बहुजन सहभागी होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. यामुळे पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डॉ. आंबेडकर उद्यान, शिवाजी चौक, बजाज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडक पुतळा चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. शिवाय मोर्चाच्या अग्रस्थानी आणि मागेही पोलिसांचे पथक पाहावयास मिळाले. प्रथम शहरातील काही मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; पण मोर्चाचे स्वरूप पाहून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मोर्चाद्वारे बहुजनांचा आक्रोश अधोरेखित करण्यात आला.
https://www.dailymotion.com/video/x844ndo