वर्धा: शासनाने प्रवाशांची मर्यादा ठरवून विना ई-पास आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता कुठे गावगाड्याची लोकवाहिनी रुळावर यायला लागली आहे. पण, बसच्या चालक-वाहकांना प्रवाशांना मर्यादेचा विसर पडल्याचे चित्र वर्धा ते आर्वी या बसमध्ये पहावयास मिळाले आहे. या बसमध्ये चक्क ४० ते ५० प्रवाशांनी सोशल डिस्टन्स न पाळता प्रवास केल्याचे धक्कादायक वास्तव एका प्रवाशाच्या सजगतेमुळे पुढे आले. प्रवाशाने या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करून ते ‘लोकमत’कडे पाठविले.
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल पाच महिन्यांपर्यंत लालपरीची चाके थांबलेली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू केली. तर आता नव्या आदेशानुसार नियमांच्या बंधनात आंतरजिल्हा वाहतूक सुरू केली आहे. बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी तोंडाला मास्क लावण्यासोबतच सोशल डिस्टन्स ठेवण्याकरिता एका बसमध्ये २२ प्रवाशांना बसण्याची मुभा दिली आहे.
बसचालक व वाहकांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही सोमवारी दुपारी १ वाजता वर्धा आगाराची एम.एच.४० एक्यू ६३३६ क्रमांकाची वर्धा-आर्वी बस आर्वीकडे निघाली. या बसमध्ये जवळपास ४० ते ५० प्रवासी बसून असल्याचे चित्रिकरणात दिसून येत आहे. बसमध्ये कुठेही सोशल डिस्टन्स दिसत नाही. एका सीटवर दोन प्रवासी बसून ही बस आर्वीकडे निघाली, त्यामुळे वाहक व चालकांनी नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी वर्धा आगार प्रमुखांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मी वर्ध्यावरून पिंपळखुटा या गावी जाण्याकरिता वर्धा बसस्थानकावरून वर्धा-आर्वी या एम.एच.३२ एक्यू ६३३६ क्रमांकाच्या बसमध्ये चढलो. तेव्हा बसमध्ये २२ ऐवजी ४० ते ५० प्रवासी दिसून आले. त्यामुळे वाहकाला विचारले असता ‘तू तुझे काम कर’ असे सांगण्यात आले. त्यामुळे मी त्या बसमधून प्रवास करून पिंपळखुटा येथे उतरलो. शासनाचे नियम असताना, बसमध्ये अशी होणारी गर्दी ही धोकादायक आहे- अभी एकापुरे, पिंपळखुटा, प्रवासी