हिंगणघाट (वर्धा) : अगदी किरकोळ कारणातून झालेल्या वादात गावगुंड आकाश उल्हेश उईके (३२) याला जमावानेच लाठ्याकाठ्या, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे हत्याकांड बुधवारी ९ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास सेलू मुरपाड गावात घडले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गजानन खडसे, पांडुरंग देवतळे, प्रकाश खडसे, सूरज सातपुते या चौघांना अटक केली असून, जवळपास १० ते १५ संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत आकाश उईके हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध दरोडा, लुटमार, मारहाणीसारखे पाच ते सहा गंभीर गुन्हेही दाखल होते. नुकताच तो जामीनवर सुटला होता. गावातीलच रहिवासी प्रकाश खडसे याने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. मृतक आकाश याने रात्रीच्या सुमारास ती दुचाकी खाली पाडून वाद निर्माण केला. गावगुंड आकाशच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळलेले १० ते १५ तरुण त्याला अद्दल घडविण्यासाठी पुढे आले. तरुणांची गर्दी पाहून आकाशने तेथून पळ काढला. हातात लाठ्याकाठ्या घेऊन जमावानेही त्याचा पाठलाग करून त्यास लाठ्याकाठ्या तसेच दगडाने ठेचले. जमावाकडून झालेल्या जबर मारहाणीत आकाश गंभीर जखमी झाला. रात्री १०:३० वाजताच्या सुमारास त्याची वहिनी मनीषा उईके हिने याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. पोलिसांनी सेलू मुरपाड गाव गाठून आकाशला पोलिस वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला.
हत्याकांडानंतर गावात तणावपूर्ण शांतता
सेलू मुरपाड गावात झालेल्या हत्याकांडानंतर गावात पोलिसांची कुमक दाखल झाली होती. पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. गुरुवारी गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती.
आरोपींनी स्वत: केले आत्मसमर्पण
आकाश उईके याची जमावाने हत्या केल्यानंतर गावासह तालुक्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर काही आरोपींनी स्वतः हिंगणघाट पोलिस ठाण्यात जात आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.
नुकताच कारागृहातून आला होता बाहेर
मृतक आकाश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून संतप्त गावकऱ्यांनी त्याला यमसदनी पाठवून नेहमीसाठीचा होणारा त्रास दूर केला.
लिस अधीक्षकांसह ताफा घटनास्थळी दाखल
हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, पोलिस निरीक्षक मारुती मुळुक, पोलिस उपनिरीक्षक ताराम, सहायक पोलिस निरीक्षक आळंदे यांनी पोलिस ताफ्यासह सेलू मुरपाड गाव गाठून घटनास्थळाची पाहणी केली.