लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मंगळवारच्या रात्री आरोग्य विभागाला कोरोनाबाधितांचे चार अहवाल प्राप्त झाले. यामध्ये पिपरी ग्रापंच्या देशमुखवाडीतील 43 वर्षीय, आंजी मोठी येथील 48 व आष्टी तालुक्यातील धाडीच्या 55 वर्षीय इसमाचा समावेश आहे. धाडी येथील बाधित व्यक्तीच्या परिवाराचे गावठी दारूच्या व्यवसायाशी तार जुळल्याने प्रशासन व आरोग्य विभागाच्या पायाखालची वाळू सरकरली आहे.
आरोग्य विभागाने धाडीतील बाधित व्यक्तीच्या परिवारातील 33 जणांना आयसोलेशन मध्ये ठेवले आहे. तर अन्य 6 जणांना गृहविलगीकरणात ठेवले आहे. बाधित व्यक्ती काही दिवसांपुर्वी नागपूर येथून आल्याची माहिती आहे. प्रकृती ठीक नसल्याने त्याने अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे उपचार केल्याची माहिती आहे. त्याच्या कुटूंबातील दोन ते तीन सदस्यदेखील आजारी असल्याचे सुत्रांनी सांगितले. बाधिताचा मोठा परिवार असून त्यांचा गावठी दारूचा व्यवसाय आहे. त्यांच्या अड्डयावरील दारू आष्टी, पेठ अहमदपूर, खडकी, साहूर सह परिसरातील अनेक गावात पोहचविल्या जात होती. त्यामुळे आष्टी तालुक्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
प्रशासनाने धाडीसह देशमुखवाडी, बुरांडे ले आऊट व आंजी येथे उपाययोजना सुरू केल्या आहे. धाडी येथील दारू अड्डे रोजरोसपणे सुरू असताना देखील आष्टी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.या अड्यामुळे कोरोना प्रसार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात रोज कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. नव्याने मिळाल्याने तीन रूग्णामुळे बांधितांची संख्या 86 वर पोहचली आहे. आंजी येथील बाधिताला कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याची माहिती आहे. मागील आठ दिवसांपासून तो आजारी होता. त्याचा परिवारील सदस्य अनेकांच्या संपर्कात आल्याचे वृत्त आहे.