गावाला रस्ताच नाही : दररोज करावा लागतो ६०० मीटर पायी प्रवासआकोली : सेलू तालुक्यात जंगलाने वेढलेले रायपूर हे ३०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाचा संबंध वर्धा शहराशी येतो. गावापासून माळेगाव (ठेका) पर्यंत रस्ता नसल्याने शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थांना जंगलातून ६०० मीटर अंतर पायी यावे लागते. यानंतर माळेगाव येथून ते वर्धेला मार्गस्थ होतात. येथेही प्रवासी निवारा व पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. परिणामी, रायपूर येथील ग्रामस्थांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचेच दिसते.रायपूर या आदिवासीबहुल गावाचा तालुका सेलू असला तरी सेलूशी कार्यालयीन कामावयतिरिक्त संबंध येत नाही. येथील विद्यार्थी दिनकर विद्यालय, श्रीकृष्ण हायस्कूल व वर्धा येथील महाविद्यालयात शिक्षण घेतात. अंतर व वाहतुकीच्या दृष्टीने ते सोईस्कर आहे. वर्धा शहरात सेलू वा अन्य मार्गाने जायचे झाल्यास तिप्पट अंतर व पैसे खर्च करावे लागतात; पण ६०० मिटर अंतर पायी चालत गेले तर पैसा आणि वेळेची बचत होते. वर्धा ते माळेगाव (ठेका) मार्गावरील चिंध्या देवापासून रायपूर गावात जाणारा रस्ता आहे. घनदाट वृक्षराजीतून ६०० मिटर आत गाव आहे. सदर जंगलात वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र श्वापदांचा वावर असतो; पण नाईलाजाने विद्यार्थी व ग्रामस्थांना जंगलालाच पसंती द्यावी लागते. ६०० मीटर अंतर चालून आल्यानंतर माळेगाव येथे निवारा नाही. परिणामी, झाडांचाच आधार घ्यावा लागतो. निर्मनुष्य असलेल्या या विनंती थांब्यावर पिण्यासाठी पाणीही नाही. उन्हाळा असो वा पावसाळा कोणत्याही ऋतूत झाडे हाच एकमेव आधार आहे. स्वातंत्र्याची ६६ वर्षे लोटूनही पक्का रस्ता मिळाला नाही. नागमोडी वळणाचा, काट्या-गोट्यातून गेलेल्या रस्त्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागते. हा जीवघेणा प्रवास ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत असला तरी शासनस्तरावर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचा तिढा सुटत नाही. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत रायपूरच्या ग्रामस्थांना दिलासा देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही काट्यांची वहिवाटसेलू तालुक्यातील रायपूर हे गाव घनदाट जंगलाने वेढलेले आहे. गावातून कुठे जायचे म्हटले तर प्रथम ६०० मिटरचे अंतर पायीच पार करावे लागते. स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला; पण रायपूरच्या नागरिकांना आजही काट्यांतूनच प्रवास करावा लागतो. गावाला अद्याप पक्का रस्ताही मिळाला नाही आणि गावापर्यंत वाहनेही जात नाही. यामुळे मरणयातना सहन करावा लागत असल्याचे दिसते.
रायपूरच्या ग्रामस्थांना करावा लागतो जीवघेणा प्रवास
By admin | Published: May 09, 2016 2:11 AM