भानखेडा येथील प्रकार : गावातील विकास कामांना बसली खीळवर्धा : भानखेडा ग्रा.पं. च्या ग्रामसेविका महिन्यात एकच दिवस गावात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विकासाला खीळ बसली, असा आरोप ग्रा.पं. पदाधिकारी करीत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली; पण कुठलीही कारवाई झाली नसल्याचे सरपंचाने म्हटले आहे. शासन व ग्रा. पं. प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून ग्रामसेवक कार्यरत असतात; पण तेच अनुपस्थित राहत असल्याने विकासकामे खोळंबतात. असाच प्रकार भानखेडा येथे घडत आहे. येथील ग्रामसेविका महिन्यातून एकच दिवस गावात येतात. परिणामी, गावातील व नागरिकांची संबधित कामे खोळंबली आहे. याबाबतच्या तक्रारीचाही उपयोग झाला नाही. ग्रामसेविका अनुपस्थित राहत असल्याने विद्यार्थी, शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणपत्र मिळत नाही. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. सदर ग्रामसेविकेवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा किसना चौधरी, प्रीतम हिवंज, रामा गायकवाड, श्रीराम खऊट, विनोद हिवंज, निरंजन चौधरी आदींनी निवेदनातून प्रशासनास दिला आहे. सदर ग्रामसेविकेशी संपर्क होऊ शकला नाही.(तालुका प्रतिनिधी)याबाबत वरिष्ठांना वारंवार तक्रारी केल्या; पण कारवाई झाली नाही. ग्रामसेविका हजर राहत नसल्याने विद्यार्थ्यांसह विकास कामेही थांबली आहेत. ही समस्या त्वरित मार्गी न लावल्यास ग्रामस्थांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.- महेश देवडे, सरपंच, भानखेडा.गावातील विकास कामे होत नसल्याची ओरड आहे. यापूर्वीही ग्रा.पं. ला भेट दिली, तेव्हा ग्रामसेविका थूल गैरहजर होत्या. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता उत्तर मिळाले नाही. या ग्रा.पं.ला स्वत: भेट देऊन तातडीने कारवाई करण्यात येईल. -दिलीप ढोणे, विस्तार अधिकारी, तरोडा सर्कल, पं.स. वर्धा.
ग्रामसेविकेच्या अनुपस्थितीने गावकरी त्रस्त
By admin | Published: September 10, 2015 2:35 AM