विरूळ (आकाजी) : गावात नुकतीच अविरोध निवडणूक पार पडली़ सर्व नवीन चेहरे ग्रा़पं़ मध्ये आले़ त्यामुळे गावात काही विकासाच्या बाबतीत बदल होण्याची अपेक्षा होती़ परंतु परिस्थिती जैसे थेच आहे़ मागील १५ दिवसापासून भवानी वार्डातील स्ट्रीट लाईट बंद आहे़ ग्रामपंचायत मेंबरपासून चपराश्यापर्यंत सर्वांना याबाबत वारंवार सांगूनही भवानी वार्ड येथील नागरिक काळ्याकुट्ट अंधारात राहत आहे़ग्रामसेवक या मागणीकडे लक्ष देत नसल्याने आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि लवकरात लवकर स्ट्रीटलाईट दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. परंतु मी नवीनच आलो, मी विरूळला ग्रामसेवक कोण आहे ते पाहतो असे उत्तर दिले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चव्हाण यांनी बी़डी़ओ़ची बाजू धरून दोन दिवसात स्ट्रीट लाईट लावायला सांगतो असे आश्वासन दिले. परंतु पंधरा दिवसाचा काळ लोटूनही स्ट्रीट लाईट लागले नाही़ ही गंभीर परिस्थिती आहे़ नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्यांना आपली कार्यपद्धती बदलून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ग्रामसेवकांना चपराशांना कडक आदेश देण्याची गरज आहे.आर्वी पं़स़ अंतर्गत अनेक गावात भीषण समस्या आहे़ ग्रामसेवक ग्रा़पं़ मध्ये वेळेवर पोहचत नाही़ त्यामुळे गावकऱ्यांना ग्रामसेवक येण्याची वाट पहावी लागते़ विरूळ येथे अनेक दिवसापासून राजीव गांधी भवनाचे काम अडले आहे़ हे काम का अडले हे विचारपूस करायला कुणाला वेळ नाही़ मागील वर्षी पायका अंतर्गत क्रीडांगण बांधण्यात आले़ या कामातही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गावातील नाल्या उपसल्या परंतु अर्धवट उपसल्याने गाळ तसाच आहे़ पाणी पुरवठा विहिरीच्या योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप माजी सरपंच बाबाराव मानकर यांनी केला आहे. गावातील समस्यां अधिकाऱ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
विरूळ ग्रा़पं़ च्या भोंगळ कारभाराने गावकरी त्रस्त
By admin | Published: June 28, 2014 12:35 AM