लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी शापोआ कर्मचाऱ्याप्रमाणे महिन्यात एक हजार रुपयात आपले कुटुंब चालवून दाखवावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष विनायक नन्नोरे यांनी केले.महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक पुलगांव शाखेची बैठक आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते.शासकीय व खाजगी शाळांमध्ये पोषण आहार तयार करण्यासाठी अनेक वर्षांपासून अल्पशा मानधनावर शालेय पोषण आहार कामगार काम करीत आहेत.या कामगारांना जगण्याएवढे मानधन द्यावे या मागणी साठी आयटक संघटनेच्यावतीने अनेक आंदोलन करण्यात आली. राज्य शासनाने शापोआ कामगारांना राज्य हिस्सा म्हणून इतर राज्याप्रमाणे मानधन व सुखसोयी देण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत मंत्रालयात सहा बैठका घेतल्या. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी शापोआ कर्मचाऱ्यांना मासिक ५००० रु.मानधन देण्याबाबत प्रस्ताव तयार केला परंतु शासनाने मंजूरी दिली नाही. ३० मार्च २०१७ रोजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे बैठक घेण्यात आली त्यामध्ये लवकरच शासन आदेश काढण्याचे आश्वासन दिले पांडेचरी राज्यात १४०००,केरळ १००००, तामिलनाडू मध्ये ७७०० रूपये मानधन शापोआ कर्मचाºयांंना दिल्या जाते. यांचा अभ्यास करावा असे आदेश वित्तमंत्री यांनी दिले. परंतु कुठलीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे राज्यातील १ लाख ७४ हजार शापोआ कर्मचाºयांत तीव्र संताप आहे.राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक च्या वतीने १७ जुलै रोजी विधानसभेच्या नागपूर पावसाळी अधिवेशनात राज्य भरातून शा.पो.आ. कर्मचारी मुक्कामी मोर्चात सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील शेकडो शापोआ कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिलीप उटाणे, गजेन्द सुरकार जयमाला बेलगे विनायक नन्नोरे वैशाली ठावरे लता कौरती शालु तिरळे संध्या थोटे असलम पठाण रेखा नवले सुनंदा वाघमारे अनिता भोयर आदींनी केले आहे.
विनायक नन्नोरे : पोषण आहार कामगारांचा विधानसभेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:41 PM
मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी शापोआ कर्मचाऱ्याप्रमाणे महिन्यात एक हजार रुपयात आपले कुटुंब चालवून दाखवावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष विनायक नन्नोरे यांनी केले.
ठळक मुद्देमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांनी हजार रुपयात कुटुंब चालवून बघावे