दिलीप चव्हाण ।सेवाग्राम : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या प्रयोगभूमीमध्ये टाकाऊ वस्तूंपासून (स्क्रॅप स्कल्चर) बापू आणि विनोबांचे शिल्प तयार करण्याचे कार्य सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळातही विनोबांचे शिल्प साकार झाले असून आता केवळ वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचना आणि कोटिंगचे काम शिल्लक राहिले आहे.वर्धा जिल्ह्याची महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्यामुळे जगविख्यात आहे. या महामानवांचे विचार व कार्य आजही प्रेरणादायी असून दीपस्तंभाप्रमाणे कार्य करीत आहेत. त्याचे कार्य व विचार नव्या पिढीला कळावे यासाठी मुंबई येथील सर जे. जे. कला महाविद्यालयाने स्क्रॅपमधून बापू आणि विनोबांचे शिल्प साकारण्याची संकल्पना मांडली. गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्ताने त्याला मंजुरी देण्यात आली असून त्याचे कामही जे. जे. कला महाविद्यालयाने स्वीकारले आहे. विनोबांचे शिल्प पूर्णत्वास गेले असून महाविद्यालयाचे अधिव्याख्याता विजय सकपाळ आणि विजय बोंदरे हे या शिल्पाची पाहणी करुन आवश्यक सूचना देतील. त्यानंतरच कोटिंगचे काम केले जाणार असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा आहे.
आचार्य विनोबा भावे चिंतनशील व संयमी व्यक्तिमत्त्व असल्याने विनोबांची हीच मुद्रा शिल्पातून साकारण्यात आली आहे. साधारणपणे १९ फूट उंचीचे हे शिल्प असून त्याकरिता १५ ते २० टन स्क्रॅप वापरण्यात आले आहे. वर्षभरापासून महाविद्यालयाचे विद्यार्थी दिवस-रात्र परिश्रम घेऊन शिल्पामध्ये जिवंतपणा आणण्यात यशस्वी झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणी आल्यात पण, शिथिलता मिळताच कामांना गती देत शिल्प साकारण्यात आले आहे. बापूच्या शिल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीमध्ये महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, राज्याचे कला संचालक राजीव मिश्रा व अधिव्याख्याता शशिकांत काकडे यांचा समावेश आहे. या शिल्पाकरिता स्वप्नील जगताप, प्रकाश गायकवाड, सी.बी. सॅम्युअल, अंबादास पैधन आदी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.