वर्धा : वेळ सकाळची...रेल्वेस्थानकावर प्रवाशांची खचाखच गर्दी...अन् अचानक ओरडण्याचा आवाज आला...पाहतात तर काय एक तरुण थेट फलाटालगतच्या हायटेंशन लाइनच्या खांबावर जाऊन उभा असलेला दिसून आला. हा भयावह थरार चक्क तीन तास फलाटावर असलेल्या प्रवाशांसह रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवला. सुदैवाने जीवितहानी झाली नसून तरुणाला सुरक्षितरीत्या खांबावरून खाली उतरवत पुलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
ही घटना १७ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुलगाव स्थानकावर घडली. पुलगाव स्थानकावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. अनेक जण पुलगाव येथून रेल्वेने नोकरीला, तसेच इतर शहरांत महाविद्यालयांत शिक्षणासाठी जातात. त्यामुळे फलाटावर मोठी गर्दी असते. अशातच सचिन मेश्राम, रा. बाभूळगाव, जि. यवतमाळ हा फलाटालगत असलेल्या रेल्वे रूळावरील हायटेंशन खांबावर चढला. तेथून आरडाओरड करीत असताना फलाटावरील प्रवाशांना ही बाब दिसली. लगेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, स्टेशन मास्तर, तसेच वर्ध्यातील आरपीएफचे निरीक्षक रामसिंग मीणा यांनी पुलगाव स्थानकावर धाव घेतली. तसेच रेल्वे कर्मचारी, नागरिकांसह पुलगाव येथील अग्निशमन दलाचे कर्मचारीही दाखल झाले. त्यांनी हायटेंशन लाइन गेलेल्या खांबावर चढलेल्या सचिन मेश्राम याला खाली उतरण्यास सांगितले. पण, तो कुणाचेही ऐकत नसल्याने कर्मचाऱ्यांनी स्वत: जीव धोक्यात घालून हायटेंशन लाइन गेलेल्या खांबावर चढून त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरवून थेट पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वीज तारांपासून दूर असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे आरपीएफ निरीक्षक रामसिंग मीणा यांनी सांगितले.
तीन तास थरार अन् नागरिक भयभीतसकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत फलाटावर हा थरार सुरू होता. अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये हा सर्व प्रकार चित्रित करीत होते. एकीकडे मानसिक असलेला सचिन मेश्राम खांबावरून खाली उतरण्यास तयार नव्हता तर दुसरीकडे आरपीएम आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तब्बल तीन तास हा सर्व थरार पुलगाव स्थानकावर सुरू होता.
अनर्थ टळला...मानसिक असलेला सचिन ज्या वीज खांबावर चढला होता, तो वीज खांब हायटेंशन लाइनचा होता. अचानक तो खांबावर चढून खांबावर उभा राहिला तेव्हा तेथील नागरिकांना ही बाब दिसून आली. पण, तो चढत असताना कुणालाही का दिसले नाही, हा प्रश्न आहे. काही दूरवरूनच हायटेंशन लाइन गेली होती. जर तो त्या तारांपर्यंत पोहचला असता तर मोठा अनर्थ झाला असता. त्याला वेळीच खांबावरून खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला.