पवनार : निसर्गाच्या चक्रातून वाचत सोयाबीनला आता शेंगा धरून त्या भरायला प्रारंभ झाला. अशात अचानक सोयाबीनची उभी झाडे वाळू लागल्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. सोयाबीनचे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पवनार येथील सोयाबीनवर आलेल्या विषाणूची पाहणी केली असता शेतकरी एकाच वाणाचा वापर करीत असल्याने विषाणूचा हल्ला होत असल्याचे पीकेव्हीचे डॉ. नेमाडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.सोयाबीनवर व्हायरस, जिवाणू, बुरशीजन्य रोगाचे एकदम आक्रमण झाले असून वातावरणातील बदल व जमिनीतील बुरशी याला कारणीभूत असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.जिल्ह्यात कृषी विभागामार्फत ‘क्रॉप सॅक’ची चमू किडीवरील नियंत्रणासाठी आहे; परंतु या चमूचे काम पिकांवर असलेल्या किडींची तपासणी व त्यावरील उपाययोजना सूचविणे आहे. सध्या सोयाबीनवर किडींचे आक्रमण जरी अल्प असले तरी विषाणूजन्य रोगाचे आक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. हा रोग हवेद्वारे पावसाद्वारे झपाट्याने पसरतो. या रोगामुळे सोयाबीनची पाने वाळायला प्रारंभ होतो. एक-दोन दिवसात अख्खे झाड वाळते, त्यामुळे त्या झाडाला असलेल्या शेंगा भरत नाही. ज्या झाडावर या व्हायरसने आक्रमण केले असेल त्यावर फवारणी करूनही उपयोग होताना दिसत नाही; परंतु तो पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येत असल्याचे पीकेव्हीचे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.पवनार शिवारात अशोक मरगडे यांच्या शेतात, प्रारंभी या रोगाची लक्षणे आढळल्यामुळे कृषी तज्ज्ञ डॉ. तोटे यांनी पिकेव्ही व कृषी विभागाला सूचना दिली. कृषी सहाय्यक भोयर यांनी सुद्धा क्रॉपसॅकच्या चमूला पाचारण केले. तालुका कृषी अधिकारी राठोडसह आत्मा प्रकल्प संचालक दीपक पटेल, सेलसुरा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ डॉ. दवने यांनी प्रत्यक्ष जाऊन शेतात पाहणी केली व शेतकऱ्यांना हा व्हायरस पसरू नये म्हणून उपाययोजना सुचविल्या. सोयाबीनची ३३५ नावाची एकच जात वर्षानुवर्षे शेतकरी वापरत आहे. यामुळे ही बियाने बियाणे अनेक विषाणूंना सोबतच घेवून येत असल्याचे डॉ. नेमाडे व डॉ. देवने यांनी सांगितले. बियाण्यांवर पेरणीपूर्वी वीज प्रक्रिया केली तर अनेक विषाणूपासून पिकांना वाचविता येते असे मत तालुका कृषी अधिकारी विपीनकुमार राठोड यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)
एकाच वाणाच्या वापरामुळे विषाणू
By admin | Published: September 12, 2015 2:01 AM