आषाढी एकादशी : उत्तम पीक आणि पावसाकरिता विठ्ठलाला साकडे लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हाती वीणा, माथी टिळा.. डोक्यावर तुळशी वृदांवन आणि मुखी विठ्ठल... विठ्ठल... जय हरी.. चा जयघोष, असे चित्र येथील विठ्ठल मंदिरात असल्याचे दिसून आले आहे. असेच दृष्य विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळख असलेल्या घोराड येथे होते. आषाढी एकादशीला जिल्ह्यात अनेकांनी विठुरायाला आलेली संकटं सोडविण्याकरिता साकडे घातले. गत काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला. सध्या अनियमित पावसामुळे काही अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. या स्थितीवर मात करण्याकरिता यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस आणि उत्तम पीक व्हावे असे म्हणत वर्धेकर मंगळवारी आषाढी एकादशीला विठ्ठलासमोर नतमस्तक झाले. महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरचा विठुराया. आषाढी एकादशीला याच विठूरायाच्या दर्शनाकरिता वारकऱ्यांची गर्दी असते. वर्धेतील विठ्ठल मंदिरातही सकाळपासूनच तशी गर्दी दिसून आली. सेलू तालुक्यात घोराड नगरीला प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते. येथील केजाजी महाराजांच्या मंदिरातही सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसून आले आहे. या व्यतिरिक्त हिंगणघाट तालुक्यातील वणा नदीच्या तिरावर असलेल्या भव्य मुर्तीजवळ भाविकांची गर्दी होती. रोहिणी आणि मृग नक्षत्र गेले. यंदा रोहिणी आणि मृग कोरडे गेले. या दिवसात पावसाची आशा होती पण त्याने दगा दिला. गत आठवड्यात आलेल्या पेरण्या तरल्या; मात्र नव्या पेरण्या धोक्यात आल्याचे चित्र आहे. पांडुरंगा.. दुबार पेरणीचे संकट टाळजिल्ह्यात यंदा वेळेवर पाऊस येईल असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. नेहमी फोल ठरणारे आश्वासन यंदा खरे होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यामुळे त्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या केल्या. मात्र ऐन वेळी पावसाने दडी मारली. अनेकांच्या पेरण्या मोडल्या. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यामुळे शेतकऱ्यांकडून पांडुरंगा.. दुबार पेरणीचे संकट टाळ असे साकडे घालण्यात येत आहे.
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी
By admin | Published: July 05, 2017 12:20 AM