लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पाणी टंचाई तीव्र होत असल्याने प्रत्येक जण नळाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. अशातही आपल्या जास्त पाणी मिळावे या उद्देशाने अनेकांनी थेट नळालाच मोटरपंप लावल्यामुळे इतरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. या आपलपोटेपणामुळे पाणी समस्या आणखीच गडद होत असल्याने पालिकेने मोटरपंप काढण्यासाठी कंबर कसली आहे.जलाशयातील पाण्याने तळ गाठल्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. पालिकेने नियोजन करुन पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करायला सुरुवात केली होती. मात्र जलाशयातच पाणी नसल्याने पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनीही आपल्याच जास्त पाणी मिळावे या उद्देशाने थेट नळालाच मोटर लावून पाणी घ्यायला सुरुवात केली. परिणामी पुढच्या घराला पाणी मिळत नसल्याने त्यांनीही नळावर मोटर लावली. असाच हा प्रकार वाढत गेल्याने बहुतांश घरी नळाला मीटर लावण्यात आले. यामुळे काहींच्या घरी पाण्याचा सुकाळ तर काहींच्या घरी दुष्काळ, अशीच परिस्थिती निर्माण झाली. याची माहिती घेण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नंदनवार व कर्मचाऱ्यांसह शहरातील गोंडप्लॉट परिसरात शनिवारी नळ आल्यानंतर पाहणी केली. तर त्यांना नळावरील मोटारीची भीषणता लक्षात आली. दहापैकी चार घरी मोटर लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना सूचना देत मोटरपंप काढायला लावली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी कारवाई टाळून स्वत: हून नळाला जोडलेली मोटर काढण्याची गरज आहे, असे मत नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी व्यक्त केले आहे.पालिकेच्या पुढाकाराला नगरसेवकांची बाधा?शहरातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी नळावरील विद्युत मीटर काढणे गरजेचे आहे. यासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेतल्याने याला आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. परंतु आपली व्होट बँक कायम ठेवण्यासाठी या कारवाईत बाधा येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण, नागरिकांचा सर्वसमावेशक प्रश्न लक्षात घेता नळावरील मोटरपंप काढण्यासाठी व्यापक मोहिम राबविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.सर्वांना पाणी मिळण्यासाठी पालिका प्रयत्न करित आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: हून नळाला लावलेले मोटरपंप काढून घ्यावे. नळाचे पाणी टाक्यात घेऊन तेथून मोटरव्दारे पाण्याची उचल करावी. अन्यथा तपासणी मोहीम राबवून नळाला मोटर असलेल्यावर कडक कारवाई केली जाईल.-अतुल तराळे, नगराध्यक्ष.
नळावरील मोटरपंप काढण्यासाठी कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:02 PM
शहरातील पाणी टंचाई तीव्र होत असल्याने प्रत्येक जण नळाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. अशातही आपल्या जास्त पाणी मिळावे या उद्देशाने अनेकांनी थेट नळालाच मोटरपंप लावल्यामुळे इतरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.
ठळक मुद्देपाणीटंचाईत भर : गोंडप्लॉट भागात मोठ्या प्रमाणावर मोटारपंप बसविल्याचे निदर्शनास