शहिदांना दिला होता भडाग्नी : २५ लाखांचा निधी खितपत लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : सन १९४२ मधील सातंत्र्यलढ्यात सहा शूर शहीद झाले होते. त्यांना एकाच ठिकाणी भडाग्नी दिला होता. या बलीदानाचे सदैव स्मरण राहावे म्हणून बाकळी नदीच्या काठावर स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्याच्या विस्तार व सौंदर्यीकरणाचे काम मंजूर झाले; पण अनेक अडथळे येत आहेत. मागील वर्षी २५ लाख रुपयांची निविदा झाली; पण अद्याप बांधकामाचा पत्ता नाही. यामुळे शहिदांच्या स्मृतिस्तंभाला सौंदर्यीकरणाची किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आष्टी शहरात दाखल होताना सुरूवातीलाच बाकळी नदीच्या काठावर शहीद स्मृतिस्तंभ आहे. त्याच्या सभोवताल काही वर्षांपूर्वी संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. या ठिकाणी दरवर्षी नागपंचमी (शहीद स्मृती दिन सोहळा), गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाते. या स्थळाची महती लक्षात घेता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहीदभूमी विकासाकरिता दिलेल्या ५ कोटींतून २५ लाख बांधकाम तथा सौंदर्यीकरणावर खर्च करण्याचे ठरले होते. त्याचे नियोजन करून सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्टेंबर २०१६ मध्ये ई -निविदा काढली. सदर काम आर्वी येथील एका एजन्सीला मिळाले; पण कामाचा कार्यारंभ आदेश मिळताच यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी लागूनच बंधारा बांधकाम व नदीपात्राचे खोलीकरण करण्याचे काम सुरू आहे. खोलीकरणाचा गाळ अगदी स्मृतिस्तंभाला लागून टाकल्याने सौंदर्यीकरणाचे काम अडकले आहे. शिवाय बांधकामाची जागा भूमिअभिलेखाच्या नकाशात दिसत नसल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाला शहिदांच्या विकासासाठी जागेची ‘अॅलर्जी’ होणे यावर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. सदर काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. सदर काम पूर्ण झाल्यावर स्मृतिस्तंभाचा कायापालट होणार आहे. सोबतच प्रवेशद्वारही होणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परिसराचे सौंदर्य खुलणार आहे. यामुळे शहीद स्मृतिस्तंभाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जागेच्या वादामुळे काम प्रलंबित शहिदांना ज्या ठिकाणी भडाग्नी दिला होता, तेथे शहीद स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्यांचे सौंदर्यीकरण मंजूर असताना जागेचा वाद समोर आला आहे. प्रस्ताव सादर करूनही अद्याप मोजमाप प्रक्रिया न झाल्याने स्मृतिस्तंभ विकास, सौंदर्यीकरणाचे काम प्रलंबित आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. शहीद स्मृतिस्तंभाची निविदा झालेली आहे. जागेच्या मोजमापाकरिता प्रकरण सादर करण्यात आले होते; पण ते काम अद्याप झाले नाही. जागेच्या मोजमापानंतरच बांधकामाचा तिढा सुटणार आहे. यामुळे बांधकामाला वेळ लागण्याची शक्यता आहे. - अनंत भाष्करवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी.
शहीद स्मृतिस्तंभाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा
By admin | Published: May 19, 2017 2:19 AM